Wednesday, 31 December 2014

कहाणी शनिवारची

आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासूसासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरांत बसून सैंपाक करून ठेवीत असे. सासूसासऱ्यांना वाढीत असे, उरलंसुरलं आपण खात असे. असं होतां होतां श्रावणमास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारीं आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाहीं. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊं घालून जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला.

इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झालीं. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासीबटकींनी घर भरलं ! सासूसासरे देवाहून आलीं, तों घर कांहीं ओळखेना. हा वाडा कोणाचा ? सून दारांत आरती घेऊन पुढं आली. मामंजी, सासूबाई, इकडे या ! अग, तूं कोणाच्या घरांत राहिली आहेस ? तिनं सर्व हकीगत सांगितली. शनिवारीं एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाही. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. जेवूं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊं घालून जेवूं घातलं. उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चवथे शनिवारीं त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. 

इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारांत उभी राहिलें. असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरांत गेलीं. त्याना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी गणपतीची



ऐका परमेश्वरा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळें, विनायकाचीं देवळें, रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा ? श्रावण्या चौथीं घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पसापायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबीं भोजन करावं, अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं घ्याईजे; मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.



कहाणी शिळासप्तमीची


आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्यानं एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना, जळदेवतेची प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या. राजा राजा, सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल. हें राजानं ऐकलं. घरीं आला मनीं विचार केला, फार दुःखी झाला. तुझ्या पुष्कळ लोकांच्या जिवापेक्षां नातवाचा जीव अधिक नाहीं, पण ही गोष्ट घडते कशी ? सून कबूल होईल कशी ? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरीं पाठवावी, मुलगा ठेवून घ्यावा.

सासऱ्यांनी आज्ञा केली, सून माहेरीं गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊं माखूं घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यांत नेऊन ठेविला. जळदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला महापूर पाणी आलं. पुढं राजाची सून माहेराहून येऊं लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनीं बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं.

तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली. वशाची आठवण झाली तो वसा काय ? तळ्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीं पान घ्यावं, दहीभात आणि लोणचं वर घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकुळं तळ्यांत टाकावं आणि देवतांची प्रार्थना करावी, जय देवी ! आई माते ! आमचे वंशी कोणी पाण्यात असतील ते आम्हांस परत मिळावेत ! याप्रमाणें तळ्यांत उभं राहून तिनं त्या दिवशीं केल्यावर, बळी दिलेला मुलगा पाय ओढूं लागला. पाय कोण ओढतं ? म्हणून पाहूं लागली, तोंच तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं कडेवर घेतला. आश्चर्य करू लागली, सासरी येऊं लागली. राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलासह येत आहे. राजास आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले. तिला विचारलं, अगं अगं मुली, तुझा मुलगा आम्हीं बळी दिला, तो परत कसा आला ?

मीं शिळासप्तमीचा वसा केला, तळ्यांत वाण दिलं. जळदेवतांची प्रार्थना केली, मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं. राजाला फार आनंद झाला. तिजवर अधिक ममता करूं लागला. जशा तिला जळदेवता प्रसन्न झाल्या, तशा तुम्हां आम्हां होवोत. ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी दिव्याच्या अवसेची


ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.

पुढं ह्या अवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ?

मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.

घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरीं आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी महालक्ष्मीची

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नांव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नांव चिमादेवराणी होतं. त्या राजाला एक शत्रु होता. त्याचं नांव नंदनबनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणीं बुडे, क्षणी अंतराळीं जाई, क्षणीं पाताळीं जाई, असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळं राजा वाळत चालला. एके दिवशीं राजानं सर्व लोक बोलावले. नंदनबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनीं राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरांत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणूं लागला, आई आई, मला भाकरी दे. मी राजाच्या शत्रूला मारायला जातों. म्हातारी म्हणाली, बाबा, तूं गरिबाचा पोर, चार पावलं पुढं जा. झाडाआड वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हंसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली.म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. 

सगळ्यांच्या पुढं गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. सर्व लोक घरीं आलें. त्यांना नंदनबनेश्वर कांहीं सांपडला नाहीं. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झालीं. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्यरात्री काय झालं ? नागकन्या, देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा सांगूं लागल्या. पोरानं विचारलं, बाई बाई, ह्यानं काय होतं ? त्यांनीं सांगितलं, पडलं झडलं सांपडतं, मनीं चितंलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोहि त्यांच्याबरोबर वसा वसूं लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरी जातीजागती झाली, तसा नागकन्या देवकन्यांनीं आशीर्वाद मागितला, तसा ह्यानंहि मागितला. तसा देवींनी दिला. राजाचा शत्रु मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशीं माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकीं घेऊन उद्यां राजाच्या अंगणांत मरून पडेल ! असं म्हणून देवी अदृश्य जाली.

म्हातारीचा पोर घरीं आला. दुसऱ्या दिवशीं राणी पहाटेस उठलीं. परसांत आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजास जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं ह्याला मारलं असेल, असं लोकांनीं राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावू धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरीं आला. त्यानं राजाला विचारलं, राजा राजा, आळ नाहीं केला, अन्याय नाहीं केला; मला इथं कां बोलावलं ? राजा म्हणाला, भिऊं नको, घाबरू नको. माझा वैरी नंदनबनेश्वर कोणी मारला ? सगळे लोक तुझं नांव सांगतात. याचं काय कारण तें सांग.

राजाला पोर म्हणाला, राजा, मीं मारला नाहीं. पण तो देवीच्या वरानं मेला ! राजा म्हणाला, ती देवी कोणती ? तिला तूं कोठं भेटलास ? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालों, त्यांच्यापुढं थोडा गेलों. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येतां येतां रात्र झाली. झाडाखालीं वस्ती केली. रात्रीं नागकन्या- देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरीं जातीजागती झाली. सर्वांना आशीर्वाद असा मिळालां कीं, शत्रु मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशीं माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तों तुझं बोलावणं आलं. राजानं हकीकत ऐकली आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं. भांडार अर्ध दिलं, माडीशीं माडीं बांधून दिली. नवलवाट नांव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागूं लागला.

ही बातमी राणीला समजली. राणीनं नवलवाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखविला. तिला सांगितलं, आश्विनमास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशीं सोळा सुताचा तातू, तेल हळद लावून करावा. सोळा दूर्वा, सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. सोळा अर्ध्य द्यावींत. मग धूपदीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेण असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणं दर आश्विनमासी करावं. स्वतः तिनं वसा समजावून घेतला. तें व्रत पाळूं लागली.

पुढं एके दिवशीं काय झालं ? राजा राणीच्या महालीं आला. सारीपाट खेळूं लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हें का, म्हणून विचारलं, राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरीं हारे बहू, दोरे बहू, कांकणे बहू, कळावे बहू. व्रताचं सूत तोडून टाक ! मला ह्याची गरज नाहीं ! पुढें रात्र झाली. राजाराणी निजली. सकाळीं दासीबटकी महाल झाडूं लागल्या. केरांत त्यांना तातू सांपडला. दासींनीं तो तातू नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला ? त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! तिनं सांगितलं उतणार नाहीं, मातणार नाहीं, घेतला वसा टाकणार नाहीं. तसा तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला.

पुढं आश्विनमास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला ! देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाट माधवराणीचें महालीं गेली. महालक्ष्मीनं तिला आठवण आहे किंवा नाही हें पाहूं लागली. तों घरांत कोठें काहींच तयारी दिसेना. तेव्हां ती पाटमाधवराणीला म्हणूं लागली, अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे ? राणीन उत्तर दिलं. आज माझ्या घरीं काहीं नाहीं. तेव्हां ती राणीला पुन्हा म्हणाली अगं, अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल ! राणीनं उत्तर दिलं, म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाहीं. तेव्हां म्हातारीनं पुन्हां पाटमाधवराणीला हांक मारली. अगं अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला दहीभाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल ! राणी म्हणाली दहीभाताची शिदोरी दिली तर माझ्या राजाला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला ? सवतीच्या न्हाणीं डाराडुरी करीत असशील, अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील ! इतकं राणीनं ऐकलं, खदखदां हंसली.

पुढं म्हातारी निघून गेली, ती चिमादेवराणीच्या महलीं आली. इकडे तिकडे पाहूं लागली तों तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं चिमादेवराणीला विचारलं, अगं अगं चिमादेवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरीं काय आहे ? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरीं महालक्ष्मी आहे. तेव्हां म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच ! राणी म्हणाली, कशानं ओळखावी ? कशानं जाणावी ! तो ती सकाळीं कुंवारीण झाली, दुपारीं सवाशीण झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. तशा तिन्ही कळा तिनं तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीनं तिला घरांत बोलावलं, न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, चौरंग बसायला दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली.

संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजणं घागरी फुंकू लागलीं, तसा घागरींचा आवाज राजाचे कानीं गेला. धुपाचा वसा महालीं आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हांक मारली, नावडतीच्या घरीं आवाज कशाचा येतो, तो तुम्ही पाहून या ! शिपाई नावडतीच्या घरीं आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महालीं आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला ! शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला, मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळू लागली, खेळतां खेळतां पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती-जागती झाली. तसं राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे ! महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊं ? राजा तुला सकाळीं घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणीं डाराडुरी करील ? अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल ! तशी चिमादेवराणीनं तिची प्रार्थना केली कीं, तिला इतका कडक शाप देऊं नये. तसं देवीनं सांगितलं की, राजा तिला बारा वर्ष वनांत तरी धाडील ! असं म्हणून देवी अदृश्य झाली.

उजाडल्यावर राजानं तिला रथांत घातलं. वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधवराणीला निरोप धाडला कीं, राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तूं सामोरी ये ! तशी ती फाटकतुटकं नेसली, घाणेरडी चोळी अंगांत घातली, केस मोकळे सोडले. कपाळीं मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तों राजानं विचारलं कीं, ओरडत किंचाळत कोण येत आहे ? भूत आहे कीं खेत आहे ? शिपायांनीं सांगितलं भूत नाही, खेत नाहीं. तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानांत नेऊन मारून टाका ! असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महालीं आला. राजाराणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधवराणीला रानांत नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसं शिपायांनीं सांगितलं, बाई बाई, रडूं नको. आम्ही तुझ्या हातचं खाल्लेले-प्यालेले आहों. आमच्याच्यानं कांहीं तुला मारवत नाहीं, म्हणून आम्ही तुला सोडून देतों. पुन्हां तूं या राज्यांत कांही येऊ नको ! असें म्हणाले. राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरांत आले.

नंतर ती तशीच फिरतां फिरतां एका नगरांत गेली. पहिल्यानं कुंभाराचे आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते. परंतु एकंहि कळस उतरेना. त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे ? तो ही सांपडली. त्यांनीं तिला हांकून पिटून लावली. पुढं ती कासाराच्या आळींत गेली. तों तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते; पण एकहि चुडा उतरेना. तेव्हां चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. तेथून निघाली ती सोनाराच्या आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते, तों एकहि दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. तिथून निघाली ती साळ्याच्या आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा साडा विणीत होते; पण एकहि साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. पुढं ती रानात निघून गेली.

जातां जातां ऋषींची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली तों ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषि स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाडसारवण करी, पुजेचं मांडून ठेवी. अशी तिनं बारा वर्षे सेवा केली. ऋषि प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथं झाडसारवण कोण करतं, त्यानं माझ्यासमोर यावं. तशी ती ऋषींच्या पुढं आली. नमस्कार केला. ऋषींनी झाडसारवणाच कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगतें. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली, ऋषींनीं पोथ्यापुस्तकं वंचू पाहिली. तों इच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनीं तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवून घेतली, रात्रीं घागरी फुंकविल्या. पहांटे महालक्ष्मीमाय कोल्हापुरीं जातीजागती झाली, तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती.

ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हां देवीनं उःशाप दिला. ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव, त्याला सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊं लागेल. राजा इथं आज-उद्या येईल. तहानेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही सगळी तयारी पहातील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल !

त्याप्रमाणं दुसऱ्या दिवशीं तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली, स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले, पोटभर फराळ केला, पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला. पुढं राजानं शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्याला सगळ्याला पाट माधवराणीच्या हातचा वास कसा आला ? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतों. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालं. आमच्यानं कांहीं तिला मारवलं नाहीं म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तिचा आसपास शोध करा ! शिपाई निघाले. ऋषींच्या गुंफा पाहिल्या. तिथं ही सापडली. राजाला जाऊन शिपायांनीं सांगितलं. राजा उठला. ऋषींच्या गुंफेत गेला. त्याचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला हवाली केलं. तसा उभयतांनीं ऋषींना नमस्कार केला. त्यांना त्यांनी आशीर्वाद दिला.

पुढं राजानं तिला रथांत घातलं. आपल्या नगरीं घेऊन आला, बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठवला, आज पाटमाधवराणीला घेऊन येत आहे, त्याला तूं सामोरी ये ! तशी राणी न्हाली, माखली, पीतांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले, नगरच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजतगाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, वाजतगाजत कोण येत आहे ? नागकन्या कीं देवकन्या ? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाहीं, देवकन्या नाहीं, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे ! तेव्हां राजा पाटमाधवराणीला म्हणाला, तूं जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते ! राणी उगीच बसली. राजानं चिमादेवीराणीला उचलून रथांत घेतली आणि दोघींसह वाजतगाजत नगरांत आला. सुखानं राज्य करूं लागला. जशी पाटमाधवराणीला महालक्ष्मीमाय कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो ! ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

शंबरासुर वध

शंबरासुर नावाचा एक राक्षसांचा राजा होता. असुरांमध्ये जरी त्याला मान होता तरी तो क्रूरकर्मा होता. श्रीकृष्ण व रुक्मिणीचा पुत्र प्रद्युन्न हा आपला वध करणार आहे, असे त्याला समजले. म्हणून प्रद्युन्नाचा जन्म झाल्यावर सहाव्या दिवशी त्याने त्याला पळवून नेऊन समुद्रात फेकले. तेथे एका मोठ्या माशाने त्याला गिळले. काही दिवसांनी एका मासेमाराने त्या माशाला पकडले. तो नेमका शंबरासुराची स्वयंपाकगृहाची व्यवस्था पाहणार्या मायावती या स्त्रीकडे गेला. ही मायावती पूर्वजन्मी कामदेवाची पत्नी होती. 

कामदेव भस्म झाल्यावर त्याच्या पुनर्जन्माची प्रतीक्षा करताना तिने शंबरासुरास मोहित केले व ती त्याच्या अंतःपुरात राहू लागली. मायावतीने तो मासा चिरताच त्यातून एक सुंदर बालक बाहेर आले. मायावतीस नारदाने सांगितले, हा भगवंतांचा पुत्र असून तू त्याचे पालनपोषण कर. तिने त्याचे संगोपन केले. तो तरुण झाल्यावर मायावतीस त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागले. आपल्या आईचे हे आपल्यावर आसक्त होणे प्रद्युन्नाच्या लक्षात येताच त्याने आश्चर्य प्रकट केले. यावर मायावतीने त्याला खरे काय ते सांगितले. प्रद्युन्न ते ऐकताच शंबरासुरावर चालून गेला. मायावतीने शिकवलेल्या मायावी विद्येने त्याने शंबरासुर व त्याच्या सैन्याला मारून टाकले. मायावतीबरोबर तो विमानाने आपल्या पित्याच्या नगरीत आला. 

रुक्मिणीला त्याला पाहताच वात्सल्यभाव दाटून आला व तिला आपल्या हरण झालेल्या मुलाची आठवण येऊ लागली. तो आपला व श्रीकृष्णाचा पुत्र असावा, असेच तिला वाटू लागले. याच वेळी नारदमुनी श्रीकृष्णासह तेथे आले. त्यांनी रुक्मिणीला हा तिचाच मुलगा असून, शंबरासुराचा वध करून तो आल्याचे सांगितले. तसेच हा प्रत्यक्ष कामदेव अर्थात मदन असून, मायावती म्हणजेच त्याची पूर्वजन्माची प्रिया रती आहे, असेही सांगितले. हे सर्व ऐकून कृष्ण व रुक्मिणीसह सर्व द्वारकानगरी आनंदित झाली.

सांबाची सूर्योपासना

सांब हा कृष्ण व जांबवती यांचा मुलगा होय. तो महाबलवान व दिसायला अतिशय सुंदर होता. स्वभावाने मात्र तो अत्यंत गर्विष्ठ होता. एकदा दुर्वास ऋषी हिंडत हिंडत द्वारकेस आले. त्यांचे शरीर अतिशय कृश व रूपही फारसे चांगले नव्हते. गर्विष्ठ सांबाने त्यांची नक्कल केली. त्यांच्याकडे बघून वेडावून दाखवले. त्यामुळे संतप्त होऊन दुर्वासांनी शाप दिला, की तुला स्वतःच्या रूपाचा गर्व आहे, कुरूप म्हणून तू माझी थट्टा केलीस तर तूही कुरूप, कुष्ठरोगी होशील. 

सांबाला शापाचे गांभीर्य कळले तरी त्याने फारसे मनाला लावून घेतले नाही, की वागणुकीतही काही बदल केला नाही. याच वेळी त्रैलोक्यात सतत संचार करणारे नारदमुनी द्वारकेत आले. नारदमुनी सर्वांना वंदनीय होते; पण सांबाने मात्र आपल्या स्वभावानुसार त्यांचा अपमान केला. या उद्धटाला धडा शिकवून त्याला नम्र बनवायचे, असे नारदांनी ठरवले. ते श्रीकृष्णांना म्हणाले,"सांब हा रूपाने अद्वितीय आहे. तुमच्या सोळा सहस्र नारी त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असतात." एवढे बोलून नारद द्वारकेतून निघून गेले.

कृष्णाचा नारदाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पुन्हा काही दिवसांनी जेव्हा नारद द्वारकेत आले तेव्हा कृष्ण अंतःपुरात होता. नारदांनी सांबाला बळेच सांगितले,"सांबा, तुझे वडील तुला हाक मारीत आहेत." नारदांवर विश्वास ठेवून सांब कृष्णाकडे गेला असता सर्व स्त्रिया सांबाकडे पाहत राहिल्या. हे पाहून श्रीकृष्ण रागावले. त्यांनी सांबाला शाप दिला, की तुझ्या रूपाकडे पाहून या स्त्रिया मोहित झाल्य.त्याला तू जबाबदार आहेस. तेव्हा तू कुरूप, कुष्ठरोगी होशील. वडिलांनी दिलेला शाप ऐकताच सांबाला दुर्वासांनी पूर्वी दिलेल्या शापाची आठवण झाली. शापानुसार सांब विद्रूप दिसू लागला. मग पश्चात्ताप होऊन तो पित्याला म्हणाला,"आपण मजवर प्रसन्न व्हावे, या दोषापासून मी मुक्त होईन असे करावे." 

त्या वेळी कृष्णांनी त्याला सूर्योपासना करण्याचा उपदेश केला, तसेच त्यांनी त्याला नारदांना शरण जाण्यास सांगितले. नारदांनी सांबाला सूर्यमाहात्म्य ऐकवले. मग पित्याची आज्ञा घेऊन सांब चंद्रभागा नदीच्या तीरी गेला व त्याने सूर्याची प्रखर उपासना केली. आपले रूप परत मिळवले. तेथे त्याने सूर्याची प्रतिष्ठापना करून सांबपूर नावाचे नगर वसवले. भजन-कीर्तनाची व्यवस्था करून ते नगर प्रजेला अर्पण केले व आपण द्वारकेस गेला.