Friday 8 February 2013

गार्गी


गार्गी

राजा जनकाचा यज्ञ संपला. राजाने विपुल दान-धर्म केला. आलेले अतिथी-अभ्यागत तृप्‍त झाले. सगळेजण राजाची मुक्‍त कंठाने स्तुती करु लागले. राजा जसा दानशूर, धार्मिक होता तसाच गुणग्राहकही होता. धर्मचर्चा, परमार्थ चर्चा याची त्याला विशेष आवड होती. या यज्ञाच्या निमित्ताने कुरु आणि पाञ्चाल देशाचे अनेक विद्वान ऋषी-महर्षी त्याच्या नगरात आले होते. त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की, या निमित्ताने विद्वज्जनात शास्‍त्रचर्चा, धर्मचर्चा घडवून आणावी. त्याने त्या सर्वांना निमंत्रित केले. मोठा दरबार भरविला. सर्वजण आल्याची खात्री झाल्यावर त्यांना उद्देशून जनक म्हणाला, “विद्वज्जनहो, आपण सगळे उपस्थित झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत असून, या सभेत आता धर्मचर्चा चांगलीच रंगेल याबद्दल आम्हाला संदेह नाही. आम्ही आमच्या गोशाळेत एक हजार गाई बांधलेल्या असून, प्रत्येक गाईच्या शिंगांना दहा-दहा सुवर्णमुद्रा बांधलेल्या आहेत. आपल्यापैकी जो सर्वांत श्रेष्‍ठ ब्रह्मवेत्ता असेल, त्याने त्या गाई घेऊन जाव्यात. नंतर होणार्‍या वादात त्याने सर्वांना जिंकले पाहिजे, हे मात्र त्याने विसरु नये.”
जनकराजाने घोषणा करुन तो आपल्या सिंहासनावर बसला. ते ऐकल्यावर सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. काहींची दृष्‍टी भूमीला खिळली. राजाच्या गोशाळेत जाऊन गाई घेऊन जाण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही. प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. जो तो मनात विचार करु लागला,”राजाने बक्षीस म्हणून ठेवलेल्या गाई आपण नेल्या तर सगळे आपल्याला अहंकारी समजतील. अभिमानी म्हणतील. धर्मचर्चा करु लागतील, आणि एखाद्याने जरी आपल्याला अडवले तर फजिती होईल. गाई परत कराव्या लागतील. केवढा अपमान होईल. त्यापेक्षा गप्प बसणेच बरे.’
काळ पुढे सरकत होता. कोणीही गाई न्यायला पुढे होत नाही हे पाहून, राजा पुन्हा उठला. पुन्हा विश्रांती केली. तरीही कोणी उठेना. हे पाहून राजा म्हणाला, “कुरु पाञ्चालातल्या या विद्वज्जनात कोणीही या सभेचे आव्हान स्वीकारु शकत नाही याचे आम्हाला आश्‍चर्य वाटते. मोठया अपेक्षेने आम्ही ही सभा बोलावली होती; पण आता धर्मचर्चेविनाच ही सभा विसर्जित करावी लागणार की काय ?”
हे ऐकताच याज्ञवल्क्यमुनी उठले. आपल्या धीरगंभीर आवाजात त्यांनी आपल्या शिष्याला सांगितले. “भारद्वाजा, ऊठ ! ही सभा विद्वज्जनांची ठरली पाहिजे. जा, महाराजांच्या गोशाळेतल्या गाई आपल्या आश्रमाकडे घेऊन जा.”
ते ऐकून सगळ्यांच्या नजरा याज्ञवल्क्यांच्याकडे वळल्या. राजाच्या मुखावर स्मिताची रेषा खुलली. इतर ऋषींना सुटल्याचा आनंद झाला असला तरी, आता याज्ञवल्क्याची वादात फजिती कशी करावी याचा विचार ते करु लागले. तोच पुन्हा याज्ञवल्क्य राजाला म्हणाले,”राजन, मी अत्यंत नम्रतेने पण आत्मविश्‍वासाने हे आव्हान स्वीकारतो. सर्वांशी चर्चा करायला मी उत्सुक आहे.” आणि सभेकडे पाहून तो म्हणाला, “मान्यवर मुनींनो ! मी तुम्हा सर्वांत श्रेष्‍ठ ब्रह्मवेत्ता आहे असा दावा मी करीत नाही. आपणा सर्व ब्रह्मवेत्त्यांना मी विनम्रतेने अभिवादन करतो. मी आपल्याशी चर्चेला तयार आहे. आपण प्रश्‍न विचारावेत. यथामती, यथाशक्‍ती मी उत्तरे देतो.”
शास्‍त्रार्थ चर्चेला सुरुवात झाली. याज्ञवल्क्यांवर प्रश्‍नांचा भडिमार सुरु झाला. ते जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी सर्व प्रश्‍नांची धैर्याने उत्तरे दिली. अश्‍वलमुनींनी निवडक प्रश्‍न विचारले; पण योग्य उत्तरे मिळताच ते गप्प बसले. नंतर आर्तभाग, भुज्यू, चाक्रायण, उषस्त आदी विद्वानांनी विविध प्रश्‍न विचारुन त्यांना अडचणीत टाकण्याचा खूप प्रयत्‍न केला. परंतु याज्ञवल्क्यांची तयारी एवढी जबरदस्त होती की, ते निरुत्तर झाले नाहीत. हळूहळू सभा शांत होत गेली; फुललेले निखारे विझत विझत शांत होतात त्याप्रमाणे ! ते पाहून गार्गी पुढे सरसारवली. तिने नम्रतेने सांगितले,”महर्षी, मलाही काही प्रश्‍न विचारायचे आहेत. ते मी विचारते, आपण त्यांची उत्तरे द्यावीत.”
“हे गार्गी, खुशाल विचार प्रश्‍न !”
“महर्षी, ज्या अर्थी हे सर्व पार्थीव पदार्थ पाण्यात ओतप्रोत आहेत, तसे पाणी कशात ओतप्रोत आहे ?”
“पाणी वायूत ओतप्रोत आहे.”
“मग वायू ?”
“आकाशात.”
“आकाश कशात ओतप्रोत आहे ?”
“अंतरीक्षात.”
“अंतरीक्ष ?”
“गंधर्वलोकात.”
“आणि गंधर्वलोक ?”
“छान. गार्गी, तुझी प्रश्‍नमालिका बरीच मोठी दिसते. मला निरुत्तर करायचा विचार दिसतोय.”
“तसं नाही, महाराज. एका उत्तरातून दुसरा प्रश्‍न तयार होत गेला म्हणून विचारते आहे. आणि उत्तरांनी अंतिम समाधान व्हायला नको का ? आपण एवढी भराभर उत्तरे देत आहात की, सारी सभा विस्मयात पडली आहे. बरं, ते जाऊ द्या. आपला प्रश्‍न अर्धवट राहील. मी विचारत होते, गंधर्वलोक कशात ओतप्रोत आहे ?” गार्गीने याज्ञवल्क्यांना पुन्हा मूळ मुद्दयावर आणीत विचारले.
“गंधर्व लोक आदित्य लोकात.”
“आदित्य लोक कशात ?”
“चंद्रलोकात.”
“चंद्रलोक ?”
“नक्षत्र लोकात.”
“आणि तो ?”
“देवलोकात.”
“महर्षी, मग देवलोक कशात ओतप्रोत आहे ते कृपया सांगावे.”
“प्रजापती लोकात.”
“आणि प्रजापती लोक ?”
“ब्रह्म लोकात.”
“फारच सुंदर ! हे महामुने, आपण माझ्या प्रश्‍नांची उत्तर फारच सुंदर आणि तत्परतेने दिलीत. मी प्रसन्न आहे. पण मुनिवर, हा ब्रह्मलोक मग कशात ओतप्रोत आहे ?”
“क्षमा कर, गार्गी ! पण ही उत्तराचि अंतिम सीमा आहे. याच्या पुढे प्रश्‍न असूच शकत नाही. यापुढे तू प्रश्‍न विचारु नयेस, असं वाटतं. तू विदुषी आहेस. ब्रह्मवादिनी आहेस. मी काय म्हणतो ते तुला समजलं असेल. याशिवाय अधिक प्रश्‍न विचारलास तर काय होईल याचीही तुला कल्पना आहे. तरीही गार्गी, तू विचारलेल्या अंतिम प्रश्‍नाच्या संदर्भात मी काही गोष्‍टी विषद करतो.”
“महाराज, मी ऐकायला उत्सुक आहे. आपण सांगण्याची कृपा करावी,अशी मी विनंती करते.”
“गार्गी ! या सर्वाचं आदिकारण ब्रह्म आहे. तेच सर्वांचं अधिष्‍ठान आहे. ज्याच्यापासून जे बनते ते त्याचे अधिष्‍ठान समजले जाते, तसे ब्रह्म हे अधिष्‍ठान आहे.”
“मुनिवर, हे अधिक स्पष्‍ट करुन नाही का सांगता येणार ?”
“येईल. ऐक. ब्रह्म हे अतिशय मोठे असून त्याचे कोणत्याही मापाने माप करता येणार नाही. त्याचप्रमाणे या ब्रह्माला कोणतेही रंग, रुप नाही. आर्द्रता नाही. ते सर्वांचा आधार असले, तरी त्याचा कशाशीही संबंध नाही. इंद्रिये ज्या शक्‍तीच्या साहाय्याने व्यापार करतात ती शक्‍ती या अक्षर ब्रह्माचीच आहे; परंतु या ब्रह्माला मात्र इंद्रिये नाहीत. हे ब्रह्म एकजिनसी असून सर्वत्र भरलेले आहे.
हे गार्गी ! इतकेच काय पण या ब्रह्माच्याच आधिपत्याखाली सूर्यचंद्र नित्य प्रकाशतात आणि पूर्वपश्‍चिमवाहिनी सरिता अखंड वाहत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर ब्रह्मांडातील सर्व देवांचा, मानवांचा, पशुपक्ष्यांचा व वनस्पतींचा सर्व व्यवहार या ब्रह्मतत्त्वाच्या शक्‍तीनेच चालतो. आणि तरीही ही शक्‍ती कोठे दृश्य स्वरुपात नाही, तर ती अदृश्य असते. उदाहरण द्यायचे झाले तर, देशाचा कारभार करण्यासाठी निरनिराळे अंमलदार नेमलेले असतात. ते आपापला कारभार नियमित आणि सुसंघटित रीतीने चालवितात, असे आपण म्हणतो. तसा कारभार करण्यासाठी लागणारी शक्‍ती त्याची स्वतःची आहे असे वरकरणी आपल्याला वाटते. पण बारकाईने विचार केला तर कळून येते की, ती शक्‍ती देशातील राजाची असते व त्याच्यापासूनच ती त्यांना प्राप्‍त झालेली असते. ब्रह्मसत्ताही पण अशीच आहे. हे गार्गी ! या ब्रह्माच्या सत्तेशिवाय या विश्‍वातील एक पानसुद्धा हलत नाही.”
आपल्या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे श्रवण करुन गार्गीचे समाधान झाले. तिने समाधानाने मान डोलाविली. तिची वृत्ती खिलाडू, उदार होती. प्रतिपक्षामधील गुण मान्य करण्याइतके तिचे हृदय सरळ व गुणज्ञ होते. त्यामुळे ती लगेचच सर्व सभेला उद्देशून म्हणाली,”ऋषिमुनींनो आणि परमपूज्य विद्वज्जनहो, आपण आतापर्यंतची शास्‍त्रचर्चा सर्वांनी ऐकलीत. त्यातून याज्ञवल्क्यमुनींचे वाक्‌चातुर्य, अभ्यास, वादकौशल्य अशा कितीतरी गुणांची ओळख आपल्याला पटलेली आहे. यांना आदराने वंदन करुन, यांचा श्रेष्‍ठपणा मान्य करण्यातच आपलाही मोठेपणा आहे. मला असं वाटतं की, तुमच्यापैकी कोणीही विद्वान या ब्रह्मवेत्त्या ऋषीला केव्हाही जिंकू शकणार नाही.”
गार्गी वादातून निवृत्त झाली. सर्व सभेने तिचा निर्णय मान्य केला. राजा जनकालाही ते पटले. त्याने सभेचा समारोप करताना गार्गीच्या विद्वत्ता, बहुश्रुतता, समयसूचकता, ब्रह्मजिज्ञासा, सभाधीटपणा, सरल हृदयी आणि गुणज्ञता आदी गुणांची मुक्‍तकंठाने स्तुती केली.
सभा संपली होती. गार्गीच्या अनेक गुणांना प्रभाव अजूनही जनमानसावर वावरत होता. जाणारे विद्वज्जन गार्गीच्या गुणांचा गौरव करीतच आपापल्या कुटीच्या दिशेन जात होते.  

सुभद्रा


सुभद्रा

अर्धी रात्र उलटून गेली होती. वद्यपक्षातल्या तृतीयेचा चंद्र आकाशात बराच वर आला होता. सुभद्रा आपल्या दोन दासींसह राजप्रासादाबाहेर आली. तिने पाहिले, सारथी रथे घेऊन तयार होता. त्या तिघीजणी रथात बसल्या. गंगेवर पर्वस्नानासाठी सुभद्रा निघाली होती. सारथ्याने घोडयांना इशारा केला. रथाने वेग घेतला. थोडयाच वेळात त्या गंगाकिनारी आल्या. खाली उतरुन चालू लागल्या. जाता जाता सुभद्रेचे लक्ष गेले, एका झाडाला एक अप्रतीम घोडी बांधलेली होती. उमदं जनावर ! डौल असा होता की, पाहत राहावे. सुभद्राही क्षणभर पाहत राहिली. मनात विचार आला, “किती छान घोडी आहे. आपल्या अश्‍वशाळेत असायला हवी होती. कुणाची बरं असावी ? अन् अपरात्री अशी वृक्षाला का बरं बांधून ठेवलेली असावी ? हिचा मालक कुठे दिसत नाही…” तिने इकडे-तिकडे पाहिले, पण कोणीच दिसेना. ती नदीकडे चालली. तिने समोर पाहिले. एक राजवेषधारि तरुण गंगेत आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. ती दासींसह पुढे गेली अन् त्याला विचारले, “आपण कोण आहात ? अशा उत्तररात्री गंगेवर कसे ?” त्या पुरुषाने चमकून पाहिले. कुणीतरी राजघराण्यातील स्त्री असावी, असं त्याला वाटलं. आता त्याला आत्महत्याही करता येणार नव्हती. तो क्षणभर विचलित झाला. चपापला. मग तो म्हणाला, “मी अभागी आहे. माझ नाव -”
“सांगा. निःसंकोचपणाने सांगा.”
“अवन्तीपती दण्डीराज -”
“आपण अवन्तीपती अन् असा आत्महत्येचा प्रसंग आपल्यावर यावा ? कोणत्या संकटात सापडला आहात ?”
“देवी ! ऐकून काय करणार आहेस ? माझं संकट ऐकून त्रिभुवनात मला कोणी आश्रय दिला नाही. मदत केली नाही. तिथं आपण…”
“मी मदत करीन, पण संकट तर समजायला हवं.”
“देवी, माझ्यासाठी संकटाला निमंत्रण देऊ नकोस. मला निदान आत्महत्या करुन तरी सुटू दे.”
“क्षमा करा. पण आपलं संकट सांगितल्याशिवाय आता आपण काहीही करु शकणार नाही.”
“सुभद्रेच्या शब्दांत नम्रता आणि निश्‍चय यांचे विलक्षण मिश्रण झालेले होते. अवन्तीपतीला आपले संकट सांगितल्याशिवाय गत्यंतर उरले नाही. तो म्हणाला, “देवी, माझ्याकडे एक त्रिभुवनात सुंदर असणारी एक घोडी आहे.”
“त्या वृक्षाला बांधलेली ?”
“होय. त्या घोडीवर माझं मनापासून प्रेम आहे. तिचा क्षणभराचाही विरह मी सहन करु शकणार नाही. परंतु द्वारकाधीश श्रीकृष्ण माझ्या प्रिय घोडीला बलपूर्वक हरण करण्याचा प्रयत्‍न करीत आहेत.”
“कोण-कृष्ण…?”
“होय, देवी ! त्यांच्याशी वैर पत्करुन लढण्याची शक्‍ती माझ्या अंगात नाही आणि या संकटासाठी मला आश्रय देऊन कृष्णाचा रोष कोण पत्करणार ? त्यामुळे मला कोणीही आश्रय देत नाही. “करुण स्वरात दण्डिराजाने सांगितले.
“मी तुम्हाला आश्रय देते.” सुभद्रा निश्‍चयी स्वरात म्हणाली.
“कोण…आपण ? आपण मला आश्रय देणार ?”
त्याच्या चेहर्‍यावर आशेचा किरण चमकला. तो तिच्याकडे आश्‍चर्याने बघू लागला. तिला त्याने विचारले, “पण देवी, आपण…आपण कोण ?”
“मी श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ! मी तुम्हाला आश्रय देते. माझे बलवान, समर्थ स्वामी आणि माझा वीरपुत्र अभिमन्यू तुमचं रक्षण करतील. श्रीकृष्ण माझा भाऊ आहे म्हणून आपण जरासुद्धा शंकित होऊ नका. आपल्याला आम्ही आश्रय दिला आहे.”
सुभद्रेने पर्वस्नान आणि आन्हिक उरकले. दण्डीराज आपल्या घोडीला घेऊन सुभद्रेबरोबर पांडवांच्या आश्रमाला आला.त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था करुन सुभद्रा अर्जुनाकडे गेली. पहाटे पहाटेच सुभद्रा आलेली पाहताच अर्जुनाला आश्‍चर्य वाटले. त्याने विचारले, “आज इतक्या सकाळीच येणं केलंत ?”
“हं ! आपल्याकडे एक महत्त्वाचं काम घेऊन आले आहे. करणार ना ?”
“आपलं काम अन् ते करणार नाही असं होईल का ?”
“पण हे काम वेगळं आहे. नाजूक आहे…”
“काम तर सांगा.”
“श्रीकृष्णाशी युद्ध !”
“आज सकाळीच थट्टा करायची लहर आलेली दिसतेय.”
“थट्टा नाही. अगदी खरंच !”
मग सुभद्रेने पर्वस्नानाला जात असताना घडलेला सगळा प्रसंग अर्जुनाला सांगितला. दण्डीराजाला अभय दिले असून त्याला आपल्याबरोबर आणल्याचेही सांगितले. ते ऐकून मात्र अर्जुन अस्वस्थ झाला. कृष्ण त्याचा जिवश्‍चकंठश्‍च सखा. त्याच्याशी संघर्ष. त्याला कल्पनाही सहन होईना. काय बोलावे हे त्याला सुचेना. ती अस्वस्थता पाहून तिनेच अर्जुनाला विचारले, “स्वामी, देणार ना दण्डीराजाला आश्रय ? आपल्यावतीनं मी त्याला आश्रय दिला आहे.”
“सुभद्रे, तू हे काय केलंस…कसल्या संकटात मला पाडलंस ? कृष्णाशी वैर करायला लावतेस ? तो त्रिभुवनाचा नायक. त्याच्याशी कोणाला तरी वैर करता येईल का ? त्याच्याविरुद्ध युद्धात कोणाला तरी जय मिळेल का ?”
“पराभवाची भीती वाटते आपल्याला ?
“तसं नाही, पण कृष्णासारखा मित्र….त्याच्याशी….”
“नाथ, आपण क्षत्रिय आहात. क्षात्रधर्म आपण जाणता. आणि त्याच विश्‍वासावर मी दण्डीराजाला अभय दिले. आपल्या पराक्रमावर विश्‍वासून मी शब्द दिला.”
“सुभद्रे, खरं आहे तुझं, पण मला कृष्णाविरुद्ध शस्‍त्र उचलणे कसे शक्य आहे ?”
“आपल्याला आपली मैत्रीच सांभाळीत बसायचं आहे तर ? आपल्या धर्मापेक्षा आपल्याला मैत्री अधिक आहे. ठीक आहे.”
“मला समजावून घे…”
“नाथ, मला एवढंच कळतं, आपण आपल्या क्षात्रधर्माचं पालन करणं आवश्यक आहे. एखाद्यावर अन्याय होत असेल तर क्षत्रियाने त्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. अन्याय करणारा कोण आहे त्याची पर्वा न करता.
आणि नाथ, शरण आलेल्याचे रक्षण करणे हाही क्षत्रियाचा धर्म आहे. आपल्याला आपली मैत्रीच प्रिय असेल तर माझी हरकत नाही; पण श्रीकृष्ण जसा आपला मित्र आहे तसाच माझा भाऊ आहे; आणि तरीही मी, दण्डराजावर अन्याय होतो आहे, तो शरण आला आहे, असं पाहून, त्याला आश्रय दिला आहे. मी तुमच्या आणि अभिमन्यूच्या पराक्रमाच्या विश्‍वासावर शब्द दिला होता. नाथ, लक्षात ठेवा, आपण आपल्या क्षात्रधर्माचं रक्षण करायचं नाकारलंत तर ही सुभद्रा स्वतः आपल्या भावाशी युद्ध करेल; पण दिलेला शब्द ती कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही.”
सुभद्रेचे ते रुप पाहून आणि तिचा निश्‍चय पाहून अर्जुन अवाक्‌ झाला. तिचे हे रुप त्याला नवे होते. एवढयात अभिमन्यूही तेथे आला. त्याला सगळी घटना कळताच त्यानेही सुभद्रेच्या मताशी सहमती दर्शविली. अर्जुनालाही सुभद्रेचे म्हणणे पटले होते. मग त्याने सांगितले, “सुभद्रे, काळजी करु नकोस. तू युद्धावर जाण्याची आवश्यकता नाही. तुझी प्रतिज्ञा तीच माझी प्रतिज्ञा आहे. मी दण्डीराजाला अभय देत आहे.
निश्‍चिंत मनाने जा.”
अर्जुनाने दण्डीराजाला आश्रय दिल्याचे श्रीकृष्णाला समजले. त्यालाही आश्‍चर्य वाटले. त्याने धर्मराजाला निरोप पाठविला,”अर्जुनाला समजावून सांग–माझ्याशी युद्धाला उभा राहू नकोस. माझं सामर्थ्य तुला माहीत आहे. तेव्हा दण्डीराजासह त्याची घोडी माझ्या स्वाधीन कर.”
धर्मराजाला निरोप कळताच त्याने अर्जुनाला बोलावून सांगितले, “अर्जुना, कृष्णाचा निरोप आला आहे.”
“दादा, कल्पना आहे मला त्याची.”
“मग, कृष्णाशी शत्रुत्‍व का पत्करतो आहेस ? देऊन टाक ती घोडी कृष्णाला.”
“दादा, आपल्याला सारं समजलं आहे. दण्डीराजाला आपण एकदा आश्रय दिल्यावर, आता त्याला झिडकारणं हे क्षत्रियाला शोभणारं नाही. आपला प्राण गेला चालेल पण, दिलेलं वचन खोटं होता कामा नये.”
“अरे, पण असं वचन दिलंस कशाला ?”
“शरण आलेल्याचं रक्षण करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हाही क्षात्रधर्म आहे हे मी आपल्याला सांगायला हवं का ? दादा, आपल्याला धर्मराज म्हणतात. आपण अधर्मानं वागणार का ?”
अर्जुनाचा प्रश्‍न योग्य होता. धर्मराजाला त्याचे उत्तर देता आले नाही. अर्जुन आपल्या क्षात्रधर्मापासून मागे जायला तयार नव्हता.
धर्मराजांनी कृष्णाला कळविले, ’अर्जुनाची बाजू योग्य आहे, तेव्हा तूच या घोडीचा नाद सोडून दे.’ पण कृष्णालाही पटेना.
अखेर दोन्ही मित्र – कृष्ण नि अर्जुन समोरासमोर युद्धाला उभे राहिले. दोघेही अतुल पराक्रमी. युद्ध सुरु झाले. कोण कुणाला ऐकणार ? दोन मित्रांचे, गुरु-शिष्यांचे, देव-भक्‍तांचे हे युद्ध पाहण्यासाठी आकाशात देवदेवता, यक्ष, गंधर्व, किन्नरांची गर्दी झाली.
शस्‍त्रांच्या घनघोर युद्धानंतर दोघांनीही अस्त्रांचा वापर करायला सुरुवात केली. दिशा कोंदाटून गेल्या. दोघेही एकमेकांच्या अस्‍त्रांना निष्प्रभ करीत होते. आता नवीन अस्‍त्र दोघांजवळही राहिले नव्हते. अखेरचा उपाय म्हणून अर्जुनाने पाशुपतास्‍त्र हाती घेतले. ते पाहताच कृष्णही संतापला आणि त्याने आपले सुदर्शन चक्र हाती घेतले. त्यांच्या दिव्य प्रभावाने सगळ्या विश्‍वात प्रलयाचे दृश्य दिसू लागले. आता दोघांना जर थांबवले नाही तर विश्‍वाचा नाश अटळ होता. हे पाहून भगवान शंकर कृष्णापुढे उपस्थित झाले. त्यांनी कृष्णाची स्तुती करुन सांगितले,”कृष्णा, तू भक्‍तवत्सल आहेस. आपल्या भक्‍तासाठी तुझी प्रतिज्ञा भंग कर. आता युद्ध पुरे.”
कृष्णाने अर्जुनाला जवळ घेतले. प्रेमाने आलिंगन दिले. देवभक्‍तांचेहे मनोमीलन भगवान शंकर आणि देवदेवता पाहत होते. त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्‍टी केली.
अर्जुनाने दण्डीराजाला सन्मानाने परत पाठवले. कृष्ण पांडवांकडे गेला.
घरी आल्यावर कृष्णाला समजले, हे सगळे सुभद्रेमुळे घडले. कृष्णाने सुभद्रेला बोलावले आणि तिच्या न्याय्य भूमिकेबद्दल तिची पाठ थोपटली. सुभद्रेला कृतकृत्यता वाटली. तीही अभिमानाने कृष्णाला म्हणाली,
“कृष्णा, मी तुझीच बहीण आहे. दण्डीराजावर अन्याय होत होता. मला तो दूर करणं भाग होतं.”
कृष्ण आणि अर्जुन दोघेही तिच्याकडे आनंदाने आणि अभिमानाने पाहत होते. 

चित्रांगदा


चित्रांगदा

अश्‍व शाळेतील शामकर्णाच्या कपाळावरील सुवर्ण-पत्रिका वाचून बभ्रुवाहनाचे मन गोंधळले. “युद्ध करावं, की नजराणा घेऊन श्यामकर्ण परत करावा,” यावर त्याला निर्णय घेता येईना. आजपर्यंत अनेक संकटांना त्याने धैर्याने तोंड दिले होते, तो विजयीही झाला होता; पण आजचा प्रश्‍न नाजूक होता. आईच यातून योग्य तो मार्ग दाखवील असा विचार करुन तो तिच्या महालाकडे निघाला.
चित्रांगदा महालात एकटीच होती. अनुमती विचारुन बभ्रुवाहन आत गेला. नमस्कार करुन तिच्या जवळच्या आसनावर बसला. त्याला असं अचानक आलेला पाहताच तिने विचारले, “आज असं अचानक येणं केलं ? दरबारात जायचं नाही ?”
“दरबारातच निघालो होतो ; पण सेवकांनी एक घोटाळा करुन ठेवलाय. त्यासाठी…”
“सेवकांनी केलेला घोटाळा तू राजा असून तुला निस्तरता येत नाही ?”
“आई, प्रश्‍न मोठा नाजूक आहे, म्हणून तुला विचारायला आलो आहे.”
“सांग, कसला घोटाळा केला आहेस ?”
“सेवकांनी अश्‍वमेधाचा श्यामकर्ण अश्‍वशाळेत बांधून ठेवला आहे, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.”
“त्यात कसला पेच ? बभ्रुवाहना, युद्धाची भीती वाटायला लागली की काय ? अरे, तुझा पिता इथे नसताना तुला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं. असं असताना तुला साधे प्रश्‍न सोडवता येत नाहीत.”
“आई, मी युद्धाला भीत नाही; पण श्यामकर्ण पांडवांचा आहे.”
“पांडवांचा–म्हणजे आपल्या घरचा–”
चित्रांगदेचा चेहरा बदलला. बभ्रुवाहनावरचा क्षणैक क्रोध मावळला. ती वेगळ्याच विचारांनी सुखावली. तिच्या बदलत्या मुखकमलाकडे पाहत बभ्रुवाहन म्हणाला, “आई, यासाठीच तुला विचारायला आलो आहे. अर्जुन स्वतः घोडयाचं रक्षण करीत आहेत. आता तूच सांग, सेवकांनी श्यामकर्ण बांधला म्हणून क्षात्रधर्माला अनुसरुन युद्धाला सज्ज होऊ की आपल्या घरचा अश्‍वमेध आहे म्हणून श्यामकर्ण घेऊन जाऊन पार्थचरणांना वंदन करु ? क्षात्रधर्म की पुत्रधर्म ? तूच सांग आई, कोणत्या धर्माचं पालन करु ?”
बभ्रुवाहनाचा प्रश्‍न ऐकून क्षणभर चित्रांगदाही विचाराक्रांत झाली. त्याला काय सांगावे हे तिला समजेना. तोच बभ्रुवाहन पुढे म्हणाला, “आई, माझं धनुर्विद्येचं शिक्षण सुरु असताना तू नेहमी म्हणायची, ’तू इतका पराक्रमी हो की, ह्यांनी तुला ’पराक्रमी’ म्हटलं पाहिजे.’ भारतीय युद्धातच पराक्रम दाखविण्याची माझी इच्छा होती; पण लहान असल्याने जाता आलं नाही. आई, मला वाटतं, आता पराक्रमाची संधी आली आहे. तेव्हा आता युद्धात भाग घ्यावासा वाटतो.”
“काय ? तू अर्जुनांशी युद्ध करणार ? अरे, आपल्या घरचा हा अश्‍वमेध. तेव्हा पुत्रधर्माचं पालन करायचं सोडून त्यात तू विघ्न आणायचा विचार करतोस ?”
“असं मी कसं करीन ?”
“मग-”
“अगं आई, युद्धात भाग घेऊ इच्छितो म्हणजे आता तातांना विश्रांती देऊन, श्यामकर्णाचं रक्षण करायला आम्ही स्वतः जावं, असं म्हणतो,. आपल्या घरच्या यज्ञात ही मदत करायलाच हवी, असं मला वाटतं. मी असताना तातांना आता त्रास कशाला ?”
“बाळ–बभ्रू–”
चित्रांगदेचा कंठ दाटून आला. आपल्या गुणी मुलाचं तिला कौतुक वाटलं. ती भारावून म्हणाली, “बाळा, तुझं म्हणणं वीर पुत्राला साजेसं असून क्षात्रधर्मालाही अनुसरुनच आहे.”
“आई, पण हे तातांना पटेल का ? ते क्षात्रवीर आहेत. मी त्यांना सामोरा गेलो तर त्यांना आवडेल का ? त्यांना हे आवडलं नाही तर ?”
“तेही खरंच !”
“म्हणून तर खरा प्रश्‍न आहे. इथे पुत्रधर्म आणि क्षात्रधर्म परस्परविरोधी आहेत.”
“तुझा प्रश्‍न योग्य असला तरी, इथं आपल्या घरचाच यज्ञ असल्याने, शरण जाण्याचा प्रश्‍न येतोच कुठे ? ही पितापुत्रांची भेट आहे. पित्याची भेट घेण्यात, त्यांना नम्रतेने सामोरे जाण्यात वीरपुत्राला काही कमीपणा आहे असं मला वाटत नाही.”
“मलाही तेच वाटतं. आई, तुझ्या इच्छेप्रमाणे सारे करतो.”
बभ्रुवाहनाने आईला नमस्कार केला. तिचा आशीर्वाद घेऊन तो महालाच्या बाहेर पडला.
श्यामकर्ण सजवला गेला. सुवर्णमुद्रांची तबके सेवकांनी हाती घेतली. सगळी सिद्धता करुन बभ्रुवाहन निघाला. पाठीमागे सारे सैन्य होते. लवाजम्यानिशी निघाला. अर्जुनाला शरण निघाला, नव्हे, पित्याचे चरणरज मस्तकी धारण करायला वीरपुत्र निघाला. त्याच्या मुखावर विलक्षण समाधान पसरले होते.
अर्जुनाला निरोप गेला – ’मणिपूरचे महाराज बभ्रुवाहन श्यामकर्ण घेऊन भेटीला येत आहेत.’ अर्जुन सुखावला. इतके दिवस युद्धाने दमलेल्या योद्धयांनाही आनंद झाला. युद्ध टळलं म्हणून !
थोडयाच वेळात बभ्रुवाहन आपल्या मंत्र्यांसह अर्जुनाला सामोरा आला. सुवर्णमुद्रांची तबके पुढे ठेवली. हात जोडून उभा राहिला. अर्जुनाचे लक्ष त्याच्या मुखावर खिळले. गतस्मृतींचे तरंग मनात उमटले. विचार आला, ’याला कुठेतरी पाहिले का ?’ उत्तर मिळत नव्हते. विचारात पडलेल्या अर्जुनाच्या मुखाकडे पाहत बभ्रुवाहनच नम्रतेने म्हणाला, “तात, मला ओळखलं नाही. मी-”
“तात ऽऽ ?”
“होय, तातच. आपण माझे पिता आहात. मी बभ्रुवाहन. चित्रांगदेचा मुलगा.”
“कोण बभ्रुवाहन-माझा मुलगा-”
“होय, तात. आपण बभ्रु-”
बभ्रुवाहनाचे शब्द पूर्ण होण्याच्या आतच अर्जुनाचा चेहरा बदलला. ’आपला मुलगा-वीर अर्जुनाचा मुलगा आणि शरणागती ?’ त्याला काही समजेना. तो ताडकन म्हणाला, “शक्य नाही ! माझा मुलगा नि असा भेकड ? अशक्य–”
असं म्हणतच नमस्कारासाठी खाली वाकलेल्या बभ्रुवाहनाच्या मस्तकावर अर्जुनाने लाथ मारली. तो खाली कोसळला. स्वतःला सावरुन तो पुन्हा उभा राहिला. अर्जुनाचा क्रोध त्याच्या मुखावर स्पष्‍ट दिसत होता. या क्रोधाच्म कारण त्याला कळेना. अर्जुनाने आपल्याला लाथ का मारावी हेही त्याच्या ध्यानात येईना. आपला काय अपराध घडला हेही त्याला समजेना. तो पुन्हा नम्रतेने, शांतपणे म्हणाला, “तात, आपण का रागावलात ? मी भ्याड नाही. मी वीर अर्जुंनाचा पुत्र आहे. तो भेकड कसा असेल ?”
“मग ही सारी लक्षणं काय तुझ्या शौर्याची आहेत ? बांधलेला श्यामकर्ण परत आणणं, ही खंडणी देणं ही कृत्यं काय तुझ्या शौर्याचे पोवाडे गात आहेत ? म्हणे मी भेकड नाही.”
“तात, आपला काहीतरी गैरसमज होतोय, पुत्रधर्माचं पालन करण्यासाठी मी..”
“शरण येणं हा पुत्रधर्म होय ? नर्तकीच्या पोरा, असं शरण येण्यापेक्षा आपल्या आईच्या नृत्यामागं मृदुंग बडविण्याच्या पुत्रधर्माचं पालन का करीत नाहीस ? युद्ध म्हणजे मृदुंग बडवणं नव्हे !”
“तात, आपण मला भ्याड म्हणालात. लाथ मारली; पण मी तिकडे दुर्लक्ष केलं. मोठया माणसांनी रागाच्या भरात मारलं अथवा अपमान केला तरी तोही हिताचाच समजावा, असं मी मानत आलो होतो. मी आपल्याला एक राजा म्हणून शरण आलो नव्हतो, पित्याची चरणधुली मस्तकी लावावी म्हणून मी आलो होतो. हे माझं राज्य आपलंच नव्हे का ? मी आपलाच पुत्र नाही का ? मग शरण येण्याचा प्रश्‍नच कोठे येत होता ? आज केवढं स्वप्नं माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतं. मी म्हणत होतो, आता आपल्याला भेटून सांगावं, ’आपण आता थकलात. विश्रांती घ्या. मी श्यामकर्णाच्या रक्षणाचा भार स्वीकारतो. हा आपल्या घरचाच यज्ञ. मी मदत करतो.’ हे स्वप्न उराशी बाळगून मी येथे आलो होतो. पण तात…मी माझ्या आईचा अपमान सहन करु शकत नाही. ती माझं सर्वस्व आहे. तिनं मला घडवलं आहे. आपण इथं आलात म्हणून किती आनंद झालाय तिला. तिच्या अनुमतीनंच मी आपल्या चरणाशी आलो होतो. आपल्याला सन्मानाने न्यायला. पण आता ते शक्य नाही. धर्मानेच आई ही पित्यापेक्षा श्रेष्‍ठ ठरविली आहे. तिचा अपमान सहन करील तो मुलगा कसला ? मी आपल्या रक्‍तानेच तिचा अपमान धुऊन काढीन. मी भ्याड नाही हे रणांगणावरच सिद्ध होईल. तात, माझं चतुरंग सैन्य तयार आहेच. थोडयाच वेळात आपली गाठ रणांगणावर पडेल.”
महामंत्र्यांच्याकडे पाहत तो म्हणाला, “महामंत्री, ही खंडणी परत घेऊन चला. युद्धाच्या नौबती वाजवा. शंखभेरी निनादू द्या, या मणिपूरचा दरारा, येथला पराक्रम सार्‍यांना समजू द्या.”
बभ्रुवाहन आपल्या रथात आला. त्याचा रथ युद्धसामग्रीने सज्ज होताच. त्याने स्वतःच शस्‍त्रास्‍त्रे भरण्यावर देखरेख केलेली होती. अर्जुनाच्या भेटीनंतर तो त्यांना मणिपुरात ठेवून स्वतः युद्धाला जाणार होता. सैन्यही तयार होतेच; पण घडले वेगळेच. इथेच युद्धाची वेळ आली.
बभ्रुवाहनाने सैन्याला इशारा दिला. नगारे निनादू लागले. शंखभेरी यांच्या प्रचंड नादाने आकाश कंपित झाले. सारे मैदान वीरांच्या आरोळ्यांनी, घोडयांच्या खंकाळण्याने, हत्तींच्या चीत्कारांनी भरुन गेले.
वाद्यांचे आवाज दूरवर ऐकू जात होते. राजप्रासादापर्यंत ! चित्रांगदेच्या कानी ते आवाज जाताच तिच्या छातीत धस्स झाले.
’हे तर युद्धवाद्यांचे आवाज ! काय झालं असावं ? ते काही बभ्रुला बोलले का ? त्याला अपमान वाटला का ? का…का रागाच्या भरात तो काही बोलला ? पण बभ्रू तसा नाही. मग हे युद्ध का ? पितापुत्रांचं युद्ध !’
तिला काही सुचेना. ती अस्वस्थ झाली. तशात तिचा उजवा डोळा लवू लागला.
अपशकुन… अपशकुन का व्हावा ? काही विपरीत घडणार आहे का ? कोणाचा तरी एकाचा विजय..पण कोणाचाही विजय झाला तरी माझा पराभवच आहे. पती विरुद्ध पुत्र ! कोणाचं यश चिंतू ?’ हे युद्ध कसं थांबवावं, हेच तिला कळेना. तिने दूताबरोबर निरोप पाठवला, “काहीही कर. महामंत्र्यांची गाठ घे अन् हे युद्ध थांबवा. बभ्रू अजून लहान आहे. पित्याशी युद्ध करण्यापासून त्याला परावृत्त करा म्हणावं.”
दूत वेगाने गेला, पण उशीर झाला होता. युद्धाला तोंड लागले होते. आता कोणीच ऐकायला तयार नव्हते.
पांडवसैन्य आणि बभ्रुवाहनाचे सैन्य दोन्ही आवेशाने लढत होती. बभ्रुवाहनाचा आवेश पाहून पार्थ चकित झाला. थोडयाच वेळात रणभूमीने उग्र स्वरुप धारण केले. रक्‍ताचे पाट वाहू लागले. मांसाचा चिखल झाला. घोडयांचे खिंकाळणे, हत्तींचे चीत्कारणे, जखमी वीरांचा आक्रोश याने वातावरण भरुन गेले. अर्जुनाला हा देखावा नवीन नव्हता; पण ज्या वेगाने बभ्रुवाहनाचे सैन्य पांडवसैन्याला गारद करीत होते, तो वेग असह्य होता. पांडवसैन्यात अतिरथी-महारथी ठरलेले वीर त्याने पार धुळीस मिळवले. सोसाटयाच्या वार्‍याने पाचोळा जसा सैरभैर होतो, तशी अवस्था पांडवसैन्याची झाली. बभ्रुवाहनाचा आवेश असाच राहिला, तर आपला पराभव होणार, असं अर्जुनाला मनोमनी वाटू लागले. त्याचे मन थोडे विचलित झाले. कधी नव्हे ती पराभवाची शंका त्याच्या मनावर आघात करु लागली.
आणि अशा द्विधा मनःस्थितीतच अर्जुनाच्या रथासमोर बभ्रुवाहनाचा रथ येऊन उभा राहिला. ते पाहून अर्जुनाने स्वतःला सावरले आणि त्याला म्हणाला, “पोरा, फार पराक्रम केलास; पण आता माझ्याशी गाठ आहे. अनेक वीरांना मी अजिंक्य ठरलो आहे.तुझा पराक्रम माझ्यापुढे चालणार नाही. आता दाखव तुझं शरलाघव.”
बभ्रुवाहनाने फक्‍त स्मित केले, दोघांच्या युद्धाला सुरुवात झाली. अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्यानेही ते सर्व बाण सहज लीलया तोडून टाकले. ते पाहून अर्जुन खवळून म्हणाला, “सांभाळ, माझ्या शरवर्षावापुढे भीष्म, कर्णही टिकले नाहीत, तिथं तुझी काय कथा ?”
“मला माहीत आहे. सारं महाभारत मला ठाऊक आहे. शूर वीर पराक्रम कधी बोलून दाखवीत नसतात. काय करायचं आहे ते करुन दाखवा. तुमच्या बाणांचा समाचार घ्यायला मी उभा आहे. येऊ द्यात बाण.”
पुन्हा शरवृष्‍टी सुरु झाली. बभ्रुवाहन पर्वतासारखा स्थिर होता. ते पाहून अर्जुनाने अस्‍त्रप्रयोग सुरु केला. त्याला अस्‍त्रांनीच उत्तर देत तो म्हणाला, “अर्जुना, हे असलं युद्ध, ही अस्‍त्रं आता फार जुनी झाली आहेत. माझ्या नव्या युद्धतंत्राने आपल्या सैन्याचा फन्ना उडत आला आहे, आणि तोही काही घटिकांच्या आत तेव्हा काही नवीन बाण असतील तर काढा, नाहीतर आता माझ्या बाणांचा मारा सहन करा.”
अर्जुनानेही आपलं सारं युद्धकौशल्य, सारा अनुभव पणाला लावला. कोणीच कोणाला हार जात नव्हते. शेवटी बभ्रुवाहनाने एक तेजस्वी बाण काढला, नेम धरुन अर्जुनावर सोडला. त्याच्या बाहूवर बाण बसला आणि तो खाली कोसळला. पांडव सैन्यात हाहाःकार उडाला. सगळीकडे एकाच विषयाची चर्चा सुरु झाली. अर्जुन पडला ! अर्जुन पडला ! ! 
बभ्रुवाहनाने काही घटकांतच पांडवसैन्याचा पराभव केला होता. तो नगरीत परतला. त्याचा जयजयकार होत होता. विजयाची वाद्येवाजत होती. सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता. बभ्रुवाहनालाही आपण आईच्या अपमानाचा सूड घेतल्याचे समाधान वाटत होते.
तो तसाच आईच्या महालात गेला. चित्रांगदा मंचकावर खिन्न होऊन बसली होती. युद्ध सुरु झाल्याची वार्ता तिच्या कानांवर आली होती. ती ऐकून भविष्यकाळाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य तिच्यात उरले नव्हते. दोघांचाही पराक्रम तिला माहीत होता. म्हणूनच याचा शेवट काय होणार याची तिला कल्पनाही करवत नव्हती. आत येताच बभ्रुवाहनाने आईला हाक मारली, “आईऽऽ”
तिने दाराकडे पाहत विचारले, “कोण-तू आलास ?”
“होय आई, तुझ्या अपमानाचं…”
“माझा अपमान !”
बभ्रुवाहनाने गेल्यापासूनचा सारा वृत्तांत सांगितला. तो पुढे म्हणाला, “आई, तुझा अपमान मला सहन झाला नाही. तुला अर्जुनाने नर्तकी म्हटलं. तू नर्तकी असलीस म्हणून काय झालं ? समाजाला त्याची आवश्यकता नाही ? समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक पेशा सारख्याच तोलामोलाचा असतो. या सार्‍या तारांचे सुसंवादी सूर निघाले, तरच समाजजीवन सुरेल होईल, हे अर्जुनाला समजावून देण्यासाठी मला त्यांच्याशी युद्ध करावं लागलं. आई-अन् मी विजयी झालो -”
“म्हणजे–त्यांचं–”
“आई, क्षमा कर मला, पण माझ्या बाणांनी अर्जुन -”
“बस्स ! बस्स कर तुझं सांगणं ! काय ऐकते आहे मी हे–तू आपल्या पित्याला मारलंस ? मला विधवा केलंस ? काय केलंस हे ? द्रौपदी, सुभद्रा या वीरमाता मला काय म्हणतील ? मुलानं बापाला ठार केलं ? आणि त्याच्या नगरात आनंदाप्रीत्यर्थ हे पडघम वाजत आहेत. बंद करा तो आवाज-बंद करा ! मी आता जिवंत राहून तरी काय करु ? ज्या हातानं त्यांना तू मारलंस त्याच हातानं मलाही ठार मार-मीही त्यांच्याबरोबर -”
“आईऽऽ -”
बभ्रुवाहनाची हाक पूर्ण व्हायच्या आधीच चित्रांगदा मूर्च्छित झाली. सारा महाल आपल्या भोवती फिरतो आहे, असं बभ्‍रुवाहनाला वाटलं. ’आईच्या अपमानाचा बदला घ्यायला गेलो अन् त्यातून हे नवंच संकट उद्‌भवलं ! काय करावं ? आई थोर मानून पित्याला शासन करायला गेलो तर पती श्रेष्‍ठ मानून आईही त्यांच्या पाठोपाठ जाणार !’ अर्जुनाला जिवंत करण्यावाचून गत्यंतर नव्हते. पण ते कसे शक्य होते ?
थोडया वेळातच ही वार्ता सगळीकडे पसरली. बभ्‍रुवाहनाची दुसरी माता उलूपी तीही शोक करीत तेथे आली. बर्‍याच प्रयत्‍नानंतर चित्रांगदा सावध झाली. ती पुन्हा शोक करु लागली.
बभ्रुवाहनाला खरं म्हणजे अर्जुनाला मारायचे नव्हते. त्याने आठवून पाहिले. एक विषलिप्‍त बाण त्यांच्या बाहूला लागल्यावर ते पडले होते. म्हणजे विष अंगात भिनल्यामुळे ते खाली कोसळले होते. हे ध्यानात आल्यावर बभ्‍रुवाहन आईकडे वळून म्हणाला, “आई, अर्जुंनांनी तुझा अपमान केला तो सहन न झाल्यानं मी त्यांच्याशी युद्ध केलं. माझ्या हातून चूक झाली. पण आई-तू शोक करु नकोस. मी त्यांना पुन्हा जिवंत करतो. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्यासाठी आणि आता माझ्यासाठीही ! माझ्यावर विश्‍वास ठेव. अर्जुन अजूनही जिवंत होतील.”
“मूर्खा-का उगाच वेडी आशा दाखवतो आहेस ? मेलेलं माणूस कधी जिवंत होईल का ? जा, मला पुन्हा तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाही…जा, चालता हो माझ्या समोरुन.”
बभ्‍रुवाहनाने आईची समजूत घातली. अर्जुनाचा मृत्यू कसा झाला हे तिला सांगून तो म्हणाला, “आई, उलूपी माता नागकन्या आहे. तिच्या वडिलांच्या जवळ नागाचे भयंकर विष उतरवून घेणारा मणी आहे. आपल्या जावयाला उठविण्यासाठी नागराज वासुकी तो मणी निश्‍चित देतील. नागलोक काही फार लांब नाही. आत्ता काही घटकांतच तो मणी येईल, आणि अर्जुन पुन्हा जिवंत होतील.”
दोन्ही मातांना हा उपाय पटला. त्यांच्या डोळ्यांत आशेचा किरण तरळला. उलूपी म्हणाली, “बभ्‍रु, पुंडरिकाला बोलाव. तो नाग असल्याने त्याला तेथली सगळी माहिती आहे. तुझे आजोबाही त्याला ओळखतात. शिवाय मी खुणेची अंगठीही त्याच्याजवळ देते म्हणजे ते लवकर मणी देतील.”
पुंडरिकाने खुणेची अंगठी घेतली. त्याचा रथा नागलोकांकडे दौडू लागला. काही वेळाने पुंडरिकाला निरोप ठेवून चित्रांगदा, उलूपी, बभ्‍रुवाहन सारे रणभूमीवर आले. आता सार्‍यांचे लक्ष त्या मण्याकडे लागले होते. चित्रांगदा डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत होती. उलूपी काळजी करीत होती. थोडया वेळातच रथ आला. बभ्‍रुवाहनाने मणी घेतला. अर्जुनाच्या अंगावरुन फिरवला. त्याने सारे विष शोषून घेतले. मणी हिरवा-निळा पडला. अर्जुनाचे शरीर पूर्ववत झाले. श्‍वासोच्छ्‌वास सुरु झाला. थोडया वेळात अर्जुन सावध झाला. त्याने पाहिले, चित्रांगदा, उलूपी, बभ्‍रुवाहन तेथे होते. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. तोही भारावला. शब्द मुके झाले. अर्जुनाने बभ्‍रुवाहनाला गाढ आलिंगन दिले. तो म्हणाला, “बाळा, आज तुझ्या शौर्यावर आम्ही संतुष्‍ट आहोत. ज्या धैर्याने तू माझ्याशी युद्ध केलेस, ते पाहून मी प्रसन्न झालो आहे.”
“तात, ही सारी आपली आणि आईची कृपा.”
“बाळा, तुझ्या पराक्रमानं आज मला दुसरा अभिमन्यू मिळाला. हा अभिमन्यूही माझाच आहे.”
पितापुत्रांचे हे प्रेम चित्रांगदा आणि उलूपी भरल्या अंतःकरणाने पाहत होत्या. त्याही कृतार्थ झाल्या होत्या. प्रेमाच्या या वर्षावाने त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. सकाळच्या सूर्यनारायणाने पितापुत्रांचा संघर्ष पाहिला होता आणि आता मावळणारा सूर्य त्यांचे वात्सल्य पाहत होता. वेगाने घडलेल्या घटनांचा ताण असह्य होऊन जणू तो विश्रांतीसाठी उत्सुक होता. डोंगराआड वेगाने जात होता.
चित्रांगदा आणि उलूपी दोघीही पती-पुत्रासह राजप्रसादी परत निघाल्या होत्या.

देवकी


देवकी

’खरंच का कृष्णाने सांदीपनी मुनींना गुरुदक्षिणा म्हणून, त्यांचा मृत पुत्र आणून दिला ? केवढा मोठा झाला आहे माझा कृष्ण–’ देवकी स्वतःशीच विचार करीत होती. ही वार्ता कळल्यावर तिला आश्‍चर्य वाटले होते आणि अभिमानही !
’मृत पुत्र परत आणता येतो ? तो परत भेटू शकतो ?…पण कृष्णाने आणला नाही का ? त्याचा अधिकार केवढा वाढला आहे. त्याने गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींची मनोकामना पूर्ण केली. माझी इच्छा तो पूर्ण करील का ? कंसाने मारलेल्या माझ्या सहा पुत्रांचे दर्शन मला पुन्हा घडेल का ? त्यांची आठवण झाली की जीव कसा व्याकुळ होतो. वाटतं, त्यांना मांडीवर घ्यावं. कुरवाळावं. त्यांना स्तनपान करावं. कुठं असतील ती मुलं…मला पुन्हा कशी दिसतील…’
देवकी मृत मुलांच्या आठवणीने भावाकुल झाली. त्या नवजात बालकांच्या आठवणींच्या तळाशी असणारे अस्पष्‍ट चेहरे तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागले. तिचे डोळे भरुन आले; आणि त्या धूसर दृष्‍टीतून ती खोल भूतकाळात गेली. तिला तिच्या विवाहापासूनच्या सार्‍या घटना डोळ्यांसमोर दिसू लागल्या.
देवकीचा विवाह वसुदेवाशी थाटामाटात पार पडला. नवविवाहिता देवकी वसुदेवासह रथात बसली. सासरी जाण्यास निघाली.
कंस हा तिचा चुलत भाऊ. बहिणीवर नितांत प्रेम. देवकी सासरी निघालेली पाहून तिला निरोप द्यायला तो आला. तिला बरं वाटावं म्हणून रथावर चढला. घोडयांचे लगाम हाती घेतले. देवकीने सर्वांचा निरोप घेतला. मंगल वाद्ये वाजू लागली. आणि लवाजम्यासह देवकी निघाली. कंस स्वतः रथ हाकीत होता. संथ गतीने ती वरात पुढे सरकत होती. सगळीकडे आनंद भरुन राहिला होता. देवकी-वसुदेवही सुखसागरात चिंब झाले होते. भावी जीवनाची स्वप्‍नं पाहत होते. भगिनीच्या विवाहाचा आनंद कंसाच्या मुखावरही दिसत होता. आणि एवढयात आकाशात मेघाशिवाय विजा चमकल्या. त्या दिव्य तेजाने सारे दीपले. अनेकांची नजर आकाशाकडे लागली. क्षणार्धात ढगाम्चा गडगडाट व्हावा तसा आवाज झाला. भीतीची एक हलकीशी लहर सगळ्यांच्या मनातून लहरुन गेली. सगळ्यांचे लक्ष आकाशाकडे असतानाच त्यांच्या कानांवर शब्द आले,”कंसा ! मूर्खा…जिच्या रथाचे घोडे तू आनंदाने हाकीत आहेस, त्या देवकीचाच आठवा मुलगा तुला ठार मारणार आहे.”
आकाशवाणीचे ते शब्द ऐकताच कंसाचा नूर बदलला. आपल्याच बहिणीचा मुलगा आपला नाश करणार आहे, हे समजताच तो संतापला. रागाने लाल झाला. त्याने घोडयांचे लगाम सोडून दिले. रथाखाली उडी मारली. तलवार उपसली आणि क्रोधाने देवकीला मारण्यासाठी उडी मारली. तलवार उपसली आणि क्रोधाने देवकीला मारण्यासाठी तो तिच्या अंगावर धावून गेला. तिची वेणी एका हातात धरली. तिला रथाखाली ओढून तिच्यावर वार करणार तोच वसुदेव विजेच्या चपलतेने पुढे सरसावले. त्यांनी कंसाला अडवीत म्हटले, “राजकुमार, आपण भोजवंशाचे कुलदीपक. मोठमोठे शूरवीर आपल्या गुणांचे कौतुक करतात. शौर्याचे गोडवे गातात. आणि आता आपण हे काय करता आहात ? अहो, देवकी ही आपली बहीण आहे, ती स्‍त्री आहे आणि शिवाय आत्ताच तिचा विवाह झाला आहे. अशा मंगल प्रसंगी आपण तिला मारणार ?”
“वसुदेवा, हिला जिवंत ठेवणं म्हणजे माझ्या मृत्यूला जिवंत ठेवण्यासारखे आहे. कोणता विचारी पुरुष आपल्या हाताने मृत्यूची जोपासना करील ?”
“अरे, तू जरा विचार कर, जो जन्म घेतो त्याला मृत्यू अटळ असतो. जन्माबरोबरच मृत्यूचाही जन्म होत असतो. आज नाही तर शंभर वर्षांनी पण मृत्यू हा येणारच. आल्या प्राण्याला जावं लागणारच. तेव्हा…”
“मी हिला सोडून देऊ–असंच ना ?”
“होय. कंसा, ही तुझी लहान बहीण आहे. हिचं जीवन अजून उमलायचं आहे. बहरायचं आहे. अजून विवाहाची मंगल चिन्हंही हिच्या अंगावरुन उतरली गेली नाहीत. म्हणून तू हिला मारु नकोस.”
वसुदेवाने वेगवेगळ्या प्रकाराने कंसाची समजूत घालण्याचा प्रयत्‍न केला. अनेक हिताच्या गोष्‍टी सांगितल्या; पण त्या दुष्‍ट कंसाची काही केल्या समजूत पटेना. ते पाहून वसुदेवाने मनात विचार केला, ’कोणत्याही उपायाने का होईना हा प्रसंग टाळलाच पाहिजे. या मंगल क्षणी विपरीत घडता कामा नये. त्यासाठी आपली मुलं याच्या स्वाधीन करण्याचे वचन दिले तर ?’
वसुदेवाने मनाशी विचार पक्का केला. आणि तो कंसाला पुन्हा म्हणाला, “हे कंसा, तुला देवकीपासून तर कोणत्याही प्रकारचं भय नाही ना ? आकाशवाणीनेही तसं काही सांगितलं नाही ना ?”
“नाही.”
“तुला भीती आहे ती तिच्या मुलांची. तिचा आठवा मुलगा तुला मारणार.”
“होय.”
“मग मी तिची मुलं तुझ्या स्वाधीन करण्याचं वचन देतो. मग तर झालं ?”
कंसही विचार करु लागला. वसुदेव आपलं वचन कधीच खोटं करणार नाही, याची त्याला खात्री होती. शिवाय त्याला भय होते ते देवकीच्या आठव्या मुलापासून–देवकीपासून नाही ! त्याला वसुदेवाचा विचार पडला. त्याने देवकीला सोडून दिले. दोघेही आपल्या महाली गेले. पण मंगल प्रसंगावर पडलेले कृष्णछायेचे झाकोळून गेले. दिवस उलटू लागले. योग्य समयी देवकीला मुलगा झाला. ठरल्याप्रमाणे त्याला कंसाच्या स्वाधीन करणे भाग होते. वसुदेव देवकीजवळ आले. त्यांचा गळा दाटून आला. कोणत्या शब्दांत देवकीची समजूत घालावी त्यांना समजेना. अखेर मोठया कष्‍टाने ते म्हणाले, “देवकी ! ठरल्याप्रमाणे…”
“आपलं बाळ त्या दुष्‍टाला द्यायला पाहिजे.”
“होय. आपला शब्द…”
“नाही, नाथ ! आपलं पहिलंवहिलं बाळ…नाही, त्या दुष्‍टाला देणार नाही.”
देवकीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तिने बाळाला हृदयाशी घट्ट धरले. वसुदेव देवकीची समजूत घालत होते, “देवकी, अगं, वेडयासारखं करु नकोस. भगवंताला जर कंसाला मारायचंच असेल तर तो सारी व्यवस्था करणार नाही का ? त्याची लीला अतर्क्य आहे. त्यावर विश्‍वास ठेव.”
“पण माझ्या आठव्या बाळापासून त्याला भय आहे. यानं त्याचं काय केलंय ?”
“खरं आहे. हे जर कंसाच्या लक्षात आलं तर तो आपलं बाळ परतही देईल. दे बाळाला…”
बराच वेळ समजूत घातल्यानंतर, देवकीने त्याला पुन्हा पुन्हा हृदयाशी धरले. भावावेगाने त्याची कितीतरी चुंबने घेतली. आणि अश्रूंच्या अभिषेकातच तिने त्याला वसुदेवाच्या हातांत दिले. देवकीच्या उचंबळून आलेल्या वात्सल्याने वसुदेवांचेही डोळे पाणावले. त्यांनी बाळाला अलगद हाती घेतले. प्रेमभराने त्याचे चुंबन घेतले. त्याला छातीशी घट्ट धरले. आपल्या अश्रूंना डोळ्यांतच रोधले आणि शिसं भरल्या पायांनी ते देवकीच्या महालातून बाहेर पडले. बाळासाठी रडून रडून जिची चर्या कोमेजून गेली आहे, म्लान झाली आहे, अशी देवकी किती तरी वेळ वसुदेवाच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे बघत उभी होती.वसुदेव दृष्टिआड होताच तिला शोक आवरेना. तिने आपले अंग मंचकावर झोकून दिले. डोळ्यांतील आसवांनी शय्या भिजून गेली. तिचे मन अंधारुन गेले होते. जीवन शून्यवत वाटत होते. अशा स्थितीत ती किती वेळ होती हे तिलाही कळले नव्हते. ती भानावर आली, ती वसुदेवांच्या हर्षभरित, प्रेमळ हाकेमुळे.
“देवकी…देवकी…” अशा हाका मारत हर्षातिरेकाने वेडावलेल्या स्थितीतच वसुदेव महालात आले. त्यांच्या हातांत त्यांचा तान्हुला होता. ते पाहताच देवकी वार्‍यासारखी पुढे झेपावली. त्यांच्या हातातून बाळाला घेत, त्याला छातीशी कवटाळीत, त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करीत ती म्हणाली, “बाळाला परत दिलं त्यानं—आता हे आपल्याजवळच राहणार ना ? आता परत नाही ना नेणार माझ्या बाळाला ?”
“देवकी, त्याने बाळाला घेऊन जा असं सांगितलं.”
“काय म्हणाला तुम्हाला ?”
मी गेलो. बाळाला दाखवलं. मी आल्याच्म पाहून त्याला बरं वाटलं होतं. तो म्हणालाही, ’तू तुझे शब्द विसरणार नाहीस याची खात्री होती मला. म्हणूनच त्या दिवशी तुम्हाला सोडलं.’ मग बाळाला पाहून तो पुढे म्हणाला, ’वसुदेवा, या नाजुक, कोवळ्या मुलाला घेऊन जा परत. यापासून मला भय नाही. आकाशवाणीनं सांगितलं होतं, देवकीच्या आठव्या मुलापासून मला भीती आहे.’ त्याने असे सांगताच मी बाळाला घेऊन आलो.”
“देव पावला—आता माझं सोनुलं माझ्याजवळ राहणार—-”
“देवकी—”
“आता काय ?”
“तुला माहीत आहे, कंस दुष्‍ट आहे. चंचल वृत्तीचा आहे. त्याचं मन त्यच्या मुळीच स्वाधीन नाही, तो केव्हा बदलेल सांगता येत नाही.
तेव्हा—”
“नका, नाथ—असं काही बोलू नका. अशा बोलण्याने माझ्या मनाला किती यातना होतात म्हणून सांगू—हृदय कोणीतरी करवतीनं कापतंय, असं वाटतं. या शुभ्र घडीला तरी असं अशुभ—”
“देवकी—-मला काहीच वाटत नाही का ? पण कंस कसा आहे हे तुलाही माहीत आहे. म्हणून सांगितलं इतकंच—
काही काळ गेला नाही तोच कंसाचा दूत आला. त्याला पाहताच वसुदेव-देवकीच्या मनात धस्स झाले.’आता हा कशाला आला? आणखी कोणतं संकट आता वाढून ठेवलं आहे ?’ असा विचार मनात येत असतानाच तो वसुदेवाला म्हणाला, “आपल्या दोघांना कंसमहाराजांनी बोलावलं आहे. आपल्या मुलाला घेऊन यायला सांगितलं आहे.”
दूत निघून गेला. देवकीनं विचारलं,”आता पुन्हा कशाला बोलावलं असेल हो त्यानं ?”
“मी तरी काय सांगू—? पण मी म्हटलं नव्हतं तो चंचल आहे. केव्हा बदलेल सांगता येत नाही.”
त्यांनी आपल्या बाळाला घेतले. दोघेही कंसाच्या महालात पोहचले. त्यांना पाहताच कंस संतापाने लालबुंद झाला. झालेला बदल वसुदेवाच्या लक्षात आला. काही वेळापूर्वी शांत, आनंदी असलेल्या कंसाला एवढं संतापायला काय झालं त्यांना कळेना. त्यांना विचार करायला वेळ मिळायच्या आतच कंस कडाडला,”देवकी—-आण ते कार्टं इकडं—”
“अरे पण दादा ऽऽ”
“माझ्या डोळ्यांत धूळ फेकता होय ?”
“काही तरी अपसमज होतोय—आम्ही काहीच केलं नाही; उलट आपण सांगितल्यावरुनच बाळाला मी परत नेलं.” वसुदेव काकुळतीला येऊन त्याला समजावू लागले.
“चूक तुमची नाही, मलाच कळलं नाही. नारदांनी डोळे उघडले नसते तर—तर मी भ्रमातच राहिलो असतो.”
“नारद आले होते इथं—काय सांगितलं त्यांनी ?”
“त्यांनी काय सांगितलं ? माझं हित आणि तुमची कारस्थानं.”
“आमची कारस्थानं ?”
“होय. तुमची कारस्थानं ! गोकुळात राहणारे नंद, गोप, गोपी, तू, ही देवकी सगळे देवतांचे अवतार आहेत, आम्हाला मारण्यासाठी सगळ्यांनी अवतार घेतलेत म्हणे ! पृथ्वीवर पापं वाढलीत. त्यांचा नाश करायचा आहे. आणि या देवकीच्या पोटी तो विष्णू अवतार घेऊन मला मारणार आहे.”
“पण महाराज, तिच्या आठव्या मुलापासून—-”
“गप्प बस—-म्हणे आठवा मुलगा ! नारद म्हणाले, तो विष्णू कपटी आहे. आठवा कुणापासून मोजणार ? आठव्या मुलापासून उलटया क्रमाने मोजले तर पहिला मुलगाही आठवा होऊ शकतो. आता माझे डोळे उघडले. आण—आण तो मुलगा इकडे.”
कंसाचे डोळे लाल झाले होते. त्याच्या उग्र चेहर्‍याकडे पाहवत नव्हते. त्याचा तो अवतार पाहून देवकी घाबरली. जोराच्या वार्‍याने केळ जशी थरथरावी तशी ती थरथरु लागली. तिने आपलय तान्हुल्याला छातीशी घट्ट धरले. वसुदेवालाही काय करावे काही कळेना. तो गोठून गेल्यासारखा उभा राहिला. कंसाने पुढे पाऊल टाकले. देवकी मागे सरली. तो पुढे आला. त्याने त्या बाळाला हात घातला. देवकीचा प्रतिकार लटका पडला. वसुदेवाने त्याला अडवण्याचा प्रयत्‍न केला पण कंसाने त्याला असा एक तडाखा दिला की, तो खाली कोसळला. त्याने देवकीच्या हातातलं मूल हिसकावून घेतलं. देवकी अक्रोश करु लागली. त्याकडे दुर्लक्ष करुन कंस नशेतच उद्‌गारला,”विष्णू तुझ्या पोटी येणार अन् मला मारणार काय ? थांब, तुलाच मी मारतो.”
त्या दुष्‍टाने त्या बाळाचा एक पाय आपल्या आडदांड हातात धरला, त्याला गरगर फिरवले आणि धाड्‌कन खाली आपटले. रक्‍ताच्या चिळकांडया उडाल्या. कंसाचे हात बाळाच्या रक्‍ताने रंगले.
आणि ते भयंकर दृश्‍य पाहून वसुदेव-देवकी बेशुद्ध पडले.
बर्‍याच वेळाने देवकी शुद्धीवर आली ती “बाळ…कुठेस तू ? कंसा ऽऽ—- दुष्‍टा, मारु नकोस रे त्याला—-सोड—-सोड—त्याला–सोड.” असं काहीतरी बरळतच ! तिने हात हलविण्याचा प्रयत्‍न केला. हातांत बेडया होत्या. तिने भोवताली पाहिले. वसुदेव खाली मान घालून तिच्याजवळ बसले होते. त्यांच्याही हातांत बेडया होत्या. ते दोघेही तुरुंगात होते. बाहेर कंसाच्या क्रूर रक्षकांचा पहारा होता. काळ पुढे सरकत होता. दोघेही बंदिखान्यातल्या जीवनाला सरावले होते. अजूनही देवकीचे दुःख कमी होत नव्हते. वसुदेव समजूत घालीत होते–”परमेश्‍वरावर विश्‍वास ठेव. तो सारं व्यवस्थित करील. कंसाला मारण्यासाठी भगवान आपल्याच उदरी येणार असतील, तर ते आपल्या सामर्थ्याने या सार्‍या शृंखला तोडून टाकतील. तू चिंता करु नकोस.”
वसुदेवांच्या स्निग्ध शब्दांनी तिला धीर यायचा. दुःख थोडे हलके व्हायचे. काळ हेच दुःखावर औषध असते. हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होऊ लागली, आणि देवकीला दुसर्‍या बाळाची चाहूल लागली. ती पुन्हा मोहरली; पण क्षणभरच ! सुख आणि दुःख हातात हात घालून त्या बंदिखान्यात वावरु लागले. दुसर्‍या बाळालाही कंसाने ठार केले. देवकीचा आक्रोश ऐकला फक्‍त तुरुंगाच्या दगडी भिंतींनी ! असे एक-दोन वेळा नाही, सहा वेळा घडले. कंसाने देवकीची सहा बाळे, तिच्याकडून हिसकवून घेऊन ठार मारली. जणू तिच्या हृदयाचे सहा वेळा लचके तोडले–क्रूरपणे ! निर्दयपणे !!
सातव्या वेळी देवकी गर्भवती झाली आणि तिचे तेज अधिक देदीप्यमान दिसू लागले. पण काय होतंय ते देवकीला कळलंच नाही नि तो गर्भ पोटातून अचानक नाहीसा झाला. देवकीला आता या यातना सहन होत नव्हत्या. ती भगवंताची प्रार्थना करत होती,
“देवा नारायणा, आता तू अवतार घे आणि या कंसाला, दुष्‍टाला मारुन टाक. आता मला हे दुःख सहन होत नाही रे ! माझ्या तान्ह्या बाळांनी कंसाचं काय वाईट केलं होतं ? डोळ्यांदेखत त्यांचा मृत्यू बघणं कोणत्या मातेला सहन होईल ? देवा, त्या दुःखाची कल्पना करायला माताच बनलं पाहिजे…तू आता लवकर ये आणि या दुष्‍टाला योग्य शिक्षा कर. आता धीर धरवत नाही.”
देवकीची प्रार्थना देवाने ऐकली. देवकी आठव्यांदा गर्भवती झाली. या वेळी तिच्या मनाला विलक्षण प्रसन्नता वाटत होती. तिचे तेज आगळेवेगळे दिसत होते. जणू शतकोटी सूर्य-चंद्र तिच्या मुखावर झळाळत आहेत. दिवस जात होते. श्रावण वद्य अष्‍टमीला देवकीने एका सुरेख बाळाला जन्म दिला. थोडयाच वेळात वसुदेव-देवकीला भगवंताने आपले चतुर्भुज रुप दाखविले. पुढचा मार्ग सांगितला. थोडयाच वेळात वसुदेव त्या बालाकाला घेऊन गोकुळात गेले. नंदपत्‍नी यशोदाही त्याच वेळी प्रसूत झाली होती. तिला मुलगी झाली होती. वसुदेवाने अपत्यांची अदलाबदल केली. पुन्हा बंदिशाळेत आले. कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता कळताच तो रागारागाने आला. ती कन्या हिसकावून घेतली आणि गरागरा फिरवून शिळेवर आपटणार तोच ती हातून निसटली आणि कंसाला म्हणाली,”दुष्‍टा, मी योगमाया तुझ्या हाती थोडीच सापडणार ? तुझा शत्रू अन्यत्र वाढतो आहे. तो तुला ठार केल्याशिवाय राहणार नाही.”
कंसाचा चेहरा उतरला. कृष्णाच्या नाशासाठी त्याने खूप प्रय‍त्‍न केले, पण उपयोग झाला नाही. कृष्णानेच कंसाला मारले. नंतर तो गुरुगृही गेला, विद्यासंपन्न झाला, आणि गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनीमुनींना त्यांचा मृतपुत्र आणून दिला. देवकीच्या डोळ्यांसमोरुन या सगळ्या घटनांचा चित्रपट सरकला. तिचा विचार अजूनही चालू होता. आता तिला कृष्णभेटीची उत्सुकता लागली होती. ती त्याची चातकासारखी वाट पाहत होती.एक दिवस सकाळीच कृष्ण-बलराम देवकीच्या महाली आले. त्यांनी मातेला वंदन केले. आशीर्वाद देऊन तिने कृष्णाला आपल्या एका बाजूला आणि  बलरामाला एका बाजूला बसवले. देवकीच्या मनातून आपल्या मृतपुत्रांची स्मृती जात नव्हती. तिने कृष्णाकडे बघत हाक मारली, “कृष्णा–मी असं ऐकलं आहे की.”
“काय, आई ?”
“गुरुगृही तू विद्या संपादन केलीस आणि गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनीमुनींना तू त्यांचा मृतपुत्र परत आणून दिलास.”
“खरं आहे. त्यांनी आणि गुरुपत्‍नीने आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं. आम्ही इकडे आल्यावर त्यांच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण होणार होती. त्यांनी सूचित केलं, ’माझा पुत्र असता तर-तर तो कायम माझ्याजवळ राहिला असता. पण आज तो…’ हे शब्द म्हणत असताना ते गहिवरले. त्यांचे डोळे पाणावले. त्यांची ती भावाकुल स्थिती माझ्याच्याने पाहवेना. म्हणून मी गुरुदक्षिणा म्हणून…”
देवकीचे डोळेही पाणावले. तिचा प्रेमळ हात कृष्णाच्या पाठीवरुन फिरत होता. तो स्पर्श वेगळा होता. बोलका होता. त्याने आईच्या मुखाकडे पाहिले नि तो म्हणाला, “तुझ्या डोळ्यांत पाणी ?”
“बाळा, तुझ्या गुरुजींचं-गुरुपत्‍नीचं दुःख हृदयाला भिडलं….”
“आईऽऽ !”
“हो. कृष्णा…आपला एक पुत्र जरी काळाने हिरावून नेला असला तरी मातेला किती दुःख होतं, त्याचा अनुभव मी घेतला आहे. पण मी…मी आणखी दुर्दैवी….”
“आई, असं का म्हणतेस ? बलदादा, मी-आम्ही दोघं समर्थ असताना तू स्वतःला दुर्दैवी का म्हणतेस ?”
“तसं नाही रे…तुमच्यासारखी गुणी मुलं, सामर्थ्यसंपन्न मुलं लाभायला भाग्यच लागतं. मी भाग्यवती आहे कृष्णा, पण…”
“पण काय, आई ?”
“मला माझ्या गतपुत्रांची स्मृती अस्वस्थ करते आहे. ती सहा बाळं माझ्या डोळ्यांसमोर येतात. वाटतं, त्यांना भेटावं. त्यांना आंजारावं-गोंजारावं ! त्यांना मांडीवर खेळवावं. कृष्णा, वेडी म्हणशील मला. पण मातृप्रेम वेडंच असतं रे ! वाटतं, त्यांना स्तनपान करावं. कृष्णा…”
“बोल, आई.”
“कृष्णा, माझ्या इच्छेसाठी….माझ्यासाठी त्या बाळांना आणशील परत ? त्यांना एकदा डोळे भरुन पाहावंसं वाटतं रे…”
कृष्णाने देवकीच्या मुखाकडे पाहिले. त्या बालकांना भेटण्याची आतुरता, त्यांच्या वियोगाचं दुःख, कारुण्य अशा कितीतरी भावना तिच्या मुखावर दाटल्या होत्या. तो म्हणाला, “आई, एवढंच ना ! त्यासाठी एवढं दीन व्हायचं काय कारण ? जे मी माझ्या गुरुसाठी केलं ते मी माझ्या मातेसाठी करु शकणार नाही का ? मातेची इच्छा पूर्ण करणं हे कर्तव्य आहे माझं. आई, तू काळजी करु नकोस. मी तुझी साही मुलं तुला भेटवितो.”
“खरंच…कृष्णा…खरंच भेटतील ती मला ?”
“होय, आई. तू निश्‍चिंत रहा.
कृष्णाच्या बोलण्याने तिचा चेहरा उजळला. तिच्या मुखावर आनंद मावेनासा झाला. कृष्ण, बलराम दोघांनीही देवकीला नमस्कार केला. प्रेमळ शब्दांनी आणि भरल्या हृदयाने तिने आशीर्वाद दिला. ते दोघे महालाबाहेर पडले. तिचे मन स्वप्‍न-विभोर बनले. मनाला असंख्य मोरपिसं फुटली. तिच्या रोमारोमात आनंद भरुन राहिला होता.
कृष्ण आणि बलराम यांनी योगमायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला. दैत्यराज बलीचे तेथे राज्य होते. त्याने रामकृष्णांना आलेले पाहताच त्यांचे स्वागत केले. त्यांना वंदन करुन उत्तम प्रकारच्या आसनावर बसविले, त्यांचे यथाविधी पूजन केले. त्यांना बहुमूल्य वस्‍त्राभूषणे दिली. त्या आदरातिथ्याने संतुष्‍ट होऊन कृष्णाने बलीला त्याचे क्षेमकुशल विचारले. काही वेळाने बलीने विचारले, “देवाधिदेवा. आज पाताललोकी येणं का केलंत ? आपलं कोणतं प्रिय मी करावं ?”
“दैत्यराज, तुझं औदार्य अखिल विश्‍वाला माहीत आहे. तू उदार आहेस म्हणून मी पुन्हा दान मागायला आलो आहे.”
“आता मी आपल्याला काय देणार ? माझ्याकडे आता काही देण्यासारखं….”
“आहे. म्हणूनच आलो आहे.”
“सांगावं आपण. मी जरुर देईन. अतिथीला तृप्‍त करुन, भरल्या मनानं पाठविण्यात आनंद असतो.”"दैत्यराज, माझ्या मातेची सहा मुलं, ती जन्मल्याबरोबरच कंसाने ठार मारली होती. त्या मुलांसाठी माझी माता अत्यंत शोकाकुल झाली आहे आणि ति मुलं तुझ्याजवळ आहेत. माझ्या मातेचा शोक दूर करण्यासाठी ती माझी भावांडे मला हवी आहेत. ती तू मला दे.”
श्रीकृष्णाचे बोलणे ऐकताच बलीने ती छोटी बालके कृष्णाच्या स्वाधीन केली. कृष्ण-बलराम त्या मुलांसह द्वारकेला परत आले. देवकी त्यांची वाट पाहत होती. कृष्ण-बलरामाला तान्हुल्या मुलांना घेऊन आलेले पाहताच ती देहभान विसरली. तिचा आनंद गगनात मावेना. कृष्ण महालात आला. त्याने ती मुले-त्याची भावंडे-आईच्या स्वाधीन केली. त्या मुलांना घेताच देवकीचे वात्सल्य उचंबळून आले. ती पुन्हा पुन्हा त्या मुलांना आपल्या हृदयाशी कवटाळू लागली. त्यांना मांडीवर घेऊन थापटू लागली. त्यांची पुन्हा पुन्हा चुंबने घेऊ लागली. त्यांची मस्तके हुंगू लागली. तिच्या स्तनांतून दूध येऊ लागले. तिने त्या मुलांना पदराखाली घेतले. त्यांना स्तनपान करविले. त्या मुलांच्या स्पर्शाने ती जणू सुखसमुद्रात पोहत होती. सुखामृतात भिजून चिंबचिंब झाली होती. त्या बालकांशिवाय तिला अन्य काहीही दिसत नव्हते. जाणवत नव्हते. ती आणि मुले दोन्ही एकरुप झाले होते. कृष्ण तिच्या जवळ उभा होता. आईच्या वात्सल्यमूर्तीचा तो नव्याने पुन्हा अनुभव घेत होता. त्याच्या मनातही मातृप्रेमाच्या लहरी उचंबळल्या. देवकीच्या त्या भावसमाधीचा भंग करीत तो म्हणाला, “आई ऽऽ”
“हं…”
“आई ऽऽ…या सगळ्यांपेक्षा मी लहान आहे. शेंडेफळ आहे तुझं…”
त्या शब्दांनी देवकी भारावून गेली. त्या बछडयांना थोडंसं बाजूला करीत तिने आपले हात पसरले. जणू वात्सल्याला अंकुर फुटले. कृष्णही पुढे गेला. मोठया प्रेमाने तिने त्याला आपल्या मांडीवर घेतले. त्याच्या मुखावरुन पुन्हा पुन्हा आपला हात फिरवला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. कृष्णाला ती त्यांनी न्हाऊ घालत होती. आणि वात्सल्याच्या त्या अपूर्व संगमाने कृष्णाच्या नेत्रांतूनही अश्रू झरत होते.

यशोदा


यशोदा

जीवनाच्या संध्याकाळी यशोदा पुत्रवती झाली. कृष्णजन्म झाला. यशोदेच्या आणि नंदाच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. सारे गोकुळच आनंदात निमग्न झाले. यशोदेला तर कृष्ण जीव की प्राण वाटू लागला. क्षणभरही ती त्याला दृष्‍टिआड होऊ देईना. तिच्या वात्सल्याच्या वर्षावाने कृष्णही गुदमरुन जात होता. वात्सल्यरसात न्हाऊन निघत होता. 

कृष्ण गोकुळात वाढतो आहे, याचा सुगावा कंसाला लागला. त्याचा नाश करण्यासाठी कंसाचे प्रय‍त्‍न सुरु झाले; आणि अगदी महिन्याच्या आतच कृष्णावर संकटांची परंपरा कोसळू लागली. संकटे कसली, यशोदेच्या वात्सल्यप्रेमाची ती परीक्षाच होती. कसोटी होती. त्या संकटातूनच कृष्णावरचे तिचे प्रेम वाढत होते. घनीभूत होत होते. कृष्ण तिचा बहिश्‍चर प्राण बनला होता. रात्रंदिवस तिला कृष्णाशिवाय काही सुचत नव्हते.
कंसाने पूतनेला कृष्णाकडे पाठविले. सांगितले, ’वात्सल्याचा आव आणायचा. त्याला स्तनपानाला जवळ घ्यायचं. आणि विषलिप्‍त स्तनपानाने त्याचा नाश करायचा.’ पूतनेने गोपसुंदरीचा वेष घेतला. ती लावण्यवती नंदाघरी आली. यशोदेकडून कृष्णाला घेतले. त्याला स्तनपान करु लागली. कृष्णाला कल्पना आली. तो विषमिश्रित दुधाबरोबर तिचे पंचप्राणच ओढून घेऊ लागला. तिने प्रयत्‍न केला पण कृष्ण स्तन सोडीना. ती घाबरी झाली, अन् कृष्णाला घेऊनच मथुरेच्या दिशेला पळत सुटली. ते पाहून यशोदा घाबरी झाली. तिला काही सुचेना. रडू लागली. भोवताली असणार्‍या गोपस्‍त्रिया पूतनेपाठोपाठ पळू लागल्या. पूतना जीवाच्या आकांताने पळत होती. कृष्ण तिचे प्राण ओढून घेतच होता. अखेर ती धाडकन पडली. मरताना तिचा आक्राळविक्राळ देह जमिनीवर पडला. कृष्ण तिच्या अंगावर होता. गोपस्‍त्रिया घाबरल्या. तशाच पुढे गेल्या. कृष्णाला कडेवर घेतले आणि तशाच धावत यशोदेकडे आल्या. तोपर्यंत यशोदेच्या जीवात जीव नव्हता. जणू तिचे प्राणच पूतनेच्या पाठोपाठ जात होते. तिच्या डोळ्यांतले अश्रू अखंड वाहत होते. गोपींनी जेव्हा त्याला यशोदेच्या हाती दिले तेव्हा तिने कृष्णाला अश्रूंनी भिजवून काढले. छातीशी घट्ट धरुन ठेवले. प्रेमभराने त्याची लाखलाख चुंबने घेतली. त्याला दृष्‍ट लागली असेल म्हणून त्याची दृष्‍ट काढली. त्याला गोठयात नेले. एका शुभलक्षणी गायीच्या शेपटाचा गोंडा त्याच्या सर्वांगावर फिरवून त्याचे मंगल व्हावे, अरिष्‍ट टळावे म्हणून देवाजवळ प्रार्थना केली. तेव्हा कुठे तिचे मन थोडेसे स्वस्थ झाले. शांत झाले.
कृष्ण दिसामासांनी मोठा होत होता आणि यशोदेचा आनंदही क्षणाक्षणाने वाढत होता. कृष्णाला पाहून तिला आनंदाचे भरते येई. त्याच आनंदात दिवस कधी निघून जाई हे कळतही नसे. कधी मांडीवर घेऊन त्याच्या मुखाकडे टक लावून पाहावे. एखादी गोपी आली की, तिला म्हणावं, बघ ना किती गोड दिसतोय हा !’ कधी त्याला खांद्यावर घेऊन गाणं म्हणत हिंडवावं. कधी पाळण्यात घालून झोका द्यावा अन् त्याने हसत हसत हात उंचावले की, पटकन छातीशी घेऊन त्याचे चुंबन घ्यावे. सारा दिवस नि रात्र तिला कृष्णाचाच ध्यास लागलेला असे.
असाच एक दिवस. अंगणात एक मोठी गाडी उभी केलेली होती. त्याच्या खाली पाळणा बांधलेला होता. यशोदेने त्याला पाळण्यात झोपवले आणि ती घरात कामाला निघून गेली. त्याच वेळी कंसाकडून उत्कच नावाचा दैत्य आला. त्याने कृष्णाला पाहिले. तो गाढ झोपला होता. त्या दैत्याने त्या गाडीत प्रवेश केला. विचार केला, ’ही गाडी पाळण्यावर ढकलून द्यावी. त्याखाली कृष्ण आपोआप चिरडला जाईल आणि आपलं काम, कोणाच्याही लक्षात न येता पुरं होईल.’ तो संधीची वाट पाहत होता.
कृष्णाला त्याच्या काव्याची कल्पना आली. त्या दैत्याने पाळण्यावर गाडी ढकलण्याआधीच, कृष्णाने पाळण्यातून पाय बाहेर काढला आणि विरुद्ध दिशेने गाडी जोरात ढकलली. दाणकन ती खाली पडली. दैत्याचाच नाश झाला. गाडी पडल्याचा भयंकर आवाज यशोदेने ऐकला मात्र अन् ती कमालीची घाबरली. हातातले पात्र खाली पडले. ’त्या गाडीखाली कृष्ण जिवंत राहिला असेल का ?’ असा विचार येऊन ती जोरात किंचाळली. अंगणाकडे धावत सुटली आणि क्षणार्धात तो ताण असह्य होऊन खाली पडली. मूर्च्छित झाली. गोपी जमा झाल्या. त्यांनी तिच्या मुखावर पाणी शिंपडले. सावध होण्यासाठी उपचार केले. थोडया वेळाने ती सावध झाली. डोळे उघडले. एका गोपीच्या खांद्यावर कृष्णाला बघितलं आणि अंगात वीज भरल्यासारखी उभी राहिली.
कृष्णाला बघितलं आणि अंगात वीज भरल्यासारखी उभी राहिली. कृष्णाला तिच्याकडून घेतले. छातीशी कवटाळले. दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. रडता रडता आपलाच धिक्कार करीत म्हणू म्हणाली, “हाय ! माझं हे पाडस लोण्याहूनही सुकोमल…त्याला मी गाडीखाली झोपवलं…ती गाडी उलट दिशेला पडून तिचे तुकडे तुकडे झाले. तीच माझ्या बाळाच्या अंगावर पडली असती तर ? एवढा विचारही माझ्या मनात आला नाही ? हे भयंकर दृश्य पाहून अजून माझे प्राण मला सोडून गेले नाहीत ? त्यांना सांभाळत अजून मी जिवंत आहे…खरंच माझं अंतःकरण वज्रापेक्षाही कठोर आहे. मी केवळ नावाची माता आहे. माझ्या मातृत्वाचा, वात्सल्याचा धिक्कार असो…”
तिचा विलाप ऐकून गोपींनी तिची कितीतरी वेळ समजूत घातली. बर्‍याच वेळाने यशोदेने कृष्णाला घेतले आणि हृदयाशी धरुन ती त्याला आत घेऊन गेली.यशोदा मनात विचार करीत असे, ’माझा कृष्ण मोठा कधी होणार ? तो रांगायला केव्हा लागेल ? त्याला दात कधी येतील ? तो बोबडा बोलून माझ्या कानांना तृप्‍त केव्हा करेल ?’या विचारात ती देहभान विसरायची. देवालाही हीच प्रार्थना करायची. आणि थोडयाच दिवसांत यशोदेचे मनोरथ परिपूर्ण झाले. कृष्ण घरभर रांगायला लागला. अंगणात जायला लागला. आपलं अंग धुळीने माखून घेऊ लागला. त्याच्या पाठीमागे फिरण्यात यशोदा मेटाकुटीला येऊ लागली. ती त्याच्या भोवती भोवती फिरु लागली. जणू आत्माच परमात्म्याभोवती फिरतो आहे. लटक्या रागाने ती त्याला बोलू लागली. थोडयाच दिवसांत त्याला दुधाचे दात आले. लालचुटुक जिवणीत पांढरे शुभ्र दात शोभून दिसू लागले. जणू माणकांच्यामध्ये मोती बसवले आहेत. कृष्ण हळूहळू बोलूही लागला. त्याच्या बोबडया बोलांनी यशोदा अमृतात न्हाली. सारे घरदार बोबडे झाले.कृष्ण अंगणात रांगत होता. यशोदा त्याच्यावर लक्ष देत होती. एवढयात वार्‍याची झुळुक आली. वार्‍याचा वेग वाढला. धूळ उडू लागली. कृष्णाला घेण्यासाठी ती पुढे आली तोच कृष्ण आकाशात उंच उडाला. ती पाहतच राहिली. क्षणभरात गडगडाटी हास्याचा आवाज आला. तो तृणावर्त राक्षस होता. ते विकट हास्य ऐकून यशोदेने किंकाळी फोडली. ’कृष्णा‍ऽऽ…’ म्हणून जोराने हाक मारली आणि ती धाडकन खाली कोसळली. आता यशोदा जिवंत राहणेच कठीण होते. गोपींनी सावध करण्याचा खूप प्रयत्‍न केला. नंदालाही बोलावून आणले. तिची हालचाल थांबली होती. श्‍वास अगदीच मंद झाला होता. सगळ्यांच्या पुढेच ’काय करावं ?’ हा प्रश्‍न पडला होता. उपचार चालू होते. इतक्यात दूर अंतरावर काही तरी मोठी वस्तू पडल्याचा आवाज झाला. काहींनी जाऊन पाहिले. तो राक्षसाचा छिन्नविछिन्न देह होता; आणि त्यावर कृष्ण शांतपणे बसला होता. गोपींनी त्याला उचलले. यशोदेपाशी आणले. तिला हलवत एक गोपी म्हणाली, “यशोदे ऽऽ यशोदे…अगं, पहातरी कोण आलंय. अगं, डोळे उघड ना…कृष्ण आलाय. खरंच, हा बघ कृष्ण…घे त्याला….”
ते शब्द तिच्या कानांवर पडले. कृष्णाचे नाव तिच्या कानांवर पडताच कुणीतरी संजीवन मंत्र म्हणावा तशी ती जागी झाली. वर्षाऋतूचं पाणी पिऊन इंद्रगोप ज्याप्रमाणे सजीव होतात तशी ती सावध झाली. कृष्णाला समोर पाहताच झटकन उठून बसली. गोपींनी कृष्णाला तिच्याजवळ दिले. मग कितीतरी वेळ ती त्याला छातीशी कवटाळून बसली होती. त्याला अश्रूंचा अभिषेक करीत होती. वात्सल्याचे ते परम मंगल दृश्य गोपीही भारावलेल्या अंतःकरणाने पाहत होत्या. कृष्णाला पाहून यशोदेचे वात्सल्य उचंबळून यायचे. जणू त्या दोघांत पैज लागायची ! यशोदेचे वात्साल्य पाहून, त्याची छाया सायीसारखी दाट व्हावी म्हणून कृष्णाचे लीलामाधुर्य शतपटीने प्रकाशित व्हायचे आणि ते लीलामाधुर्य पाहून यशोदेच्या भावसिंधूवर सहस्‍त्रावधी तरंग निर्माण व्हायचे. यामुळेच यशोदेचे वात्सल्य अनन्त, असीम आणि अपार बनले होते. त्या वात्सल्यात निमग्‍न असणारी यशोदा सारं सारं विसरुन गेली होती. स्वतःलाही विसरली होती. तिचे नेत्र केवळ कृष्णाला पाहत होते. तिचे मन केवळ कृष्णाचाच विचार करीत होते. तिचे हृदय केवळ कृष्णप्रेमच जतन करीत होते. ती कृष्णमय होऊन
गेली होती. काळाचं अखंडत्व, कोणी सांगितले तर खंडित व्हायचे अन् दिवस-रात्र तिला कळायचं; नाहीतर अखंड काळ तिच्यासमोर कृष्णमय होऊनच वावरत होता.
एका सकाळी कृष्ण अंगणात गेला. खेळता खेळता त्याने मातीची बुचकुली भरली आणि तोंडात घातली. यशोदेने ते पाहिले. हातातले काम टाकून ती तशीच धावत बाहेर आली. तिने कृष्णाच्या पाठीत धपाटा घातला. त्याला रागावून म्हणाली, “माती खाल्लीस ? तोंड उघड पाहू.”
कृष्णाने मुकाटयाने तोंड उघडले. ती त्याच्या तोंडात माती कुठे ते पाहू लागली. आणि पाहता पाहता पाहतच राहिली. तिचे नेत्र विस्फारले गेले. ती चित्रासारखी स्थिर झाली. चेहर्‍यावर आश्‍चर्य दाटले. कृष्णाच्या मुखात सारे विश्‍व तिला दिसले. ते अतर्क्य दृश्य पाहून ती भयचकित झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. कितीतरी वेळ ती त्याच स्थितीत होती. थोडया वेळाने कृष्णाने तोंड मिटले. कृष्णाने आपल्या मायेचे पटल पुन्हा यशोदेवर पसरले. ती हे सारं विसरुन गेली. तिने कृष्णाला कडेवर घेतले आणि ती त्याला घरात घेऊन गेली. यशोदा कृष्णलीलेत रंगून गेली होती तरी काळ आपले कर्तव्य विसरला नव्हता. तो आपल्या गतीने पुढे सरकत होता. कृष्णाला आता चांगलेच पाय फुटले होते. तो शेजारीपाजारी जाऊ लागला होता. स्वभावाने खोडकर.
गप्प बसणे माहीतच नाही. त्यामुळे गोपींच्या घरी जाऊन तो उचकाउचकी करु लागला. दह्यादुधाची भांडी सांडू लागला. फोडू लागला. लोणी खाऊन सगळं अंग बरबटून घेऊ लागला. आणि तक्रारी करुन गोपी यशोदेला भंडावून सोडू लागल्या. असा एकही दिवस जात नव्हता की, ज्या दिवशी कृष्णाची कोणतीही तक्रार आली नव्हती. कृष्णाच्या खोडया पाहून ती काही वेळा रागवायची. पण थोडयाच वेळात तो राग शांत व्हायचा अन् हृदयाकाशात वात्सल्याचा पूर्ण चंद्र आपल्या शीतल चंद्रिकेचा वर्षाव करायचा.
पण एक दिवस मात्र कृष्णाने कमालच केली. घरात दहयाचे एक भांडे पूर्वापार चालत आले होते. सहवासाने त्यासंबंधी यशोदेला प्रेम होते. कृष्ण खेळत खेळत आला. हातातली काठी त्याच्यावर मारली आणि एवढं मोठं सुंदर भांडं फोडून टाकलं. ते पाहून यशोदा रागावली. ’आता मात्र याला शिक्षा केलीच पाहिजे. अवखळपणा फारच वाढलाय.’
“रोज दह्याची भांडी फोडतोस. सगळ्याजणी तुझ्याबद्दल तक्रार करतात. थांब.तुला आता चांगली शिक्षा करते.”
तिला समोर उखळ दिसले. कृष्णाला तिने उखळापाशी नेले. त्याला धाक वाटावा म्हणून तिने त्या उखळाला त्याला घट्ट बांधून ठेवले. मग ती घरात निघून गेली.
कृष्णाने पाहिले, यशोदा आत गेली आहे. तिचे लक्ष नाही. त्या उखळापासून बर्‍याच दूर अंतरावर दोन अर्जुनवृक्ष अगदी जवळ जवळ उभे होते. कृष्ण उखळासह पुधे चालू लागला. त्या वृक्षांपाशी आला. उखळ त्या दोन वृक्षांच्यामध्ये अडकले. त्या वृक्षांना कृष्णस्पर्श होताच जोराचा आवाज झाला. ते दोन्ही वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. ते वृक्ष म्हणजे नलकबूर आणि मणिग्रीव नावाचे कुबेराचे पुत्र होते. कृष्णाचा सहवास मिळताच त्यांना त्यांचे मूळ रुप मिळाले आणि ते आकाशमार्गाने जाऊ लागले. आवाज होताक्षणीच यशोदा घाबरुन बाहेर आली. तिचा लाडका कान्हा उखळासह खूप दूर गेला होता. यमलार्जुन वृक्ष खाली कोसळले होते. कृष्ण आनंदात उभा होता. यशोदेने कृष्णाला सोडले. त्याला हाताला धरुन ती आत आणू लागली पण येता येता त्याचे रक्षण कसे करावे, कंसाच्या वक्रदृष्‍टीतून त्याला कसे वाचवावे हाच विचार तिला अस्वस्थ करीत होता. केवळ यशोदाच नव्हे, तर सारेच व्रजवासी कृष्णाच्या सुरक्षिततेची काळजी करु लागले. आजपर्यंत पूतना, शकरासुर, तृणावर्त यांपासून परमेश्‍वरानेच त्याला वाचवले, असे सगळे समजत होते. पण आता या गोकुळात राहणे सर्वांनाच धोक्याचे वाटू लागले. त्या सगळ्यांनी ठरवले, आता गोकुळात राहायचे नाही. वृंदावनात जायचे. त्याप्रमाणे सारे वृंदावनात आले. यशोदा-कृष्णही गोकुळातून वृंदावनात आले.
वृंदावनात आल्यानंतरही कृष्णाच्या लीला सुरुच होत्या. कधी गोपबालक यशोदेला कृष्णाचे पराक्रम सांगत असत, तर कधी यशोदा स्वतःच ते पाहत असे. त्यामुळे कधी ती आनंदात बुडून जाई तर कधी या मुलाचं रक्षण कसं करायचं, या विचाराने तिचे प्राण व्याकुळ होत असत. कासावीस होत असत. आता कृष्ण मोठा झाला होता. सवंगडयांच्या बरोबर यमुनातीरी खेळायला जाऊ लागला होता. खेळताना तन्मय होऊ लागला होता. एकदा दुपारी यमुनातीरी विटीदांडूचा खेळ मांडला होता. खेळ रंगत आला. एकाने विटी मारली ती यमुनेच्या डोहात पडली. ती आणण्यासाठी कृष्ण धावत सुटला. कृष्णाला कल्पना नव्हती, पण तो डोह कालिया नागाचा होता. त्याने फूत्कारुन फूत्कारुन त्या डोहाचे पाणी विषारी करुन टाकले होते. कोणीही त्या पाण्याचा उपयोग करु शकत नव्हते. गायींना ते पाणी पिता येत नव्हते. कृष्णाच्या सवंगडयांना हे माहीत होते. त्यामुळेच कृष्ण विटी काढायला निघाल्याबरोबर ते ओरडू लागले, “कृष्णा ! थांब-त्या डोहाकडे जाऊ नकोस. त्या डोहात कालिया नाग आहे. यमुनामाईचं पाणी विषारी झालं आहे. तू जाऊ नकोस तिकडे- आपण दुसरी विटी करु–”
कृष्णाच्या कानांवर ते शब्द पोहचलेच नाहीत. तो तीरासारखा धावत गेला. आणि बाकीचे नको-नको म्हणत असताना त्याने त्या डोहात उडी मारली. लाटा उसळल्या अन् शांत झाल्या. आता कृष्ण परत येत नाही असा विचार करुन काही गोपबालक घराकडे धावत गेले. त्यांनी ही वार्ता सांगताच सारे लोक, गोपी यमुनाकाठी जमा झाल्या. यशोदेला तर काहीच सुचेना. ती धावतपळतच यमुनातीरी आली. कालियाच्या डोहातून कृष्ण आता परत येणार नाही याची सर्वांची खात्री पटली. पुढे जायला कोणीच तयार नव्हते. जाणे शक्यही नव्हते. ते सारं पाहून यशोदा रडू लागली. तिची समजूत तरी कोण घालणार अन् कशी ? कृष्ण सर्वांचा आवडता. सगळ्याच गोपी त्याच्यावर पुत्रवत प्रेम करायच्या. आणि आता कृष्णाच्या अनिष्‍ट कल्पनेनेच सार्‍यांना दुःख अनावर झाले. सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रू झरत होते आणि सारे गोप, कृष्णाचे सवंगडी हतबुद्ध होऊन, यमुनेच्या त्या डोहाकडे पाहत होते. सगळे हवालदील झाले होते. काय करावे कोणालाच सुचत नव्हते. वेळाचे भान कोणालाच नव्हते. बर्‍याच वेळाने डोहातल्या लाटा पुन्हा हलल्या. आणि सूर्यबिंब क्षितिजावर हळूहळू वर यावे तसा कृष्ण कालियाच्या फण्यावर उभा राहून वर येऊ लागला. ते पाहताच गोपाळ ओरडले,”तो पहा, आला, कृष्ण आला-”
यशोदेने समोर पाहिले. कृष्ण आला होता. तिला सारंच अतर्क्य होतं. हसताना रडावं का रडताना हसावं हेच तिला कळेना. एवढयात कृष्णाने कालियाच्या फण्यावरुन तीरावर उडी मारली. पुन्हा धावत तो यशोदेकडे आला अन्‌ लडीवाळपणे म्हणाला, “आईऽऽ तू इथे कशाला आलीस ? अन् रडतेस कशाला ! विटी आणायला म्हणून मी डोहात उडी मारली. ही बघ विटी घेऊन वर आलो.”
या त्याच्या बोलण्यावर, त्याला काय बोलावे हेच तिला कळेना. तिने त्याला घट्ट मिठी मारली. गोपींनीही सुटकेचे निःश्‍वास टाकले. सगळ्यांनी त्याला अश्रूंनी भिजवले. त्या आनंदात ते घरी कधी परतले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. कृष्णाच्या लीला दिवसेंदिवस वाढतच होत्या. यशोदा घरी असली तरी तिचं लक्ष सारखं श्रीकृष्णाकडे असायचे. डोळे त्याला पाहायला आतुर असत, कान त्याचे बोल ऐकायला उत्सुक असत अन् हात त्याला उचलून घ्यायला अधीर झालेले असत. कंसाच्याही कानांवर कृष्णाचे स्थलांतर गेले होते. तोही अनेक असुरांना पाठवीत होताच. वत्सासुर, बकासुर, केशी असे कितीतरी जण कृष्णाला मारण्यासाठी आले; पण कृष्णापुढे त्यांचे काही चालले नाही. कृष्णाच्या या पराक्रमाचे गोपालांनी वर्णन केले की, यशोदा मोहरुन येई आणि त्याच वेळी त्याच्या रक्षणाच्या काळजीने भयाकूल होत असे. अशा अनेक प्रसंगी यशोदेच्या अंतःकर्णात हर्षाच्या, दुःखाच्या ज्या लहरी उचंबळून येत त्यांत ती स्वतःतर बुडून जात असेच, पण व्रजवासींनाही त्यांत बुडवून टाकत असे.
असाच एक दिवस. संध्याकाळ होत होती. मथुरेच्या रस्त्याने एक रथ भरधाव वेगाने वृंदावनात येत होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. रथ जवळ आला. अक्रूर त्यातून खाली उतरला. त्याने नंदाची गाठ घेतली. अक्रूर त्यांचा आप्‍तेष्‍टच होता. दोघांनीही एकमेकांना क्षेमकुशल विचारले. रात्रीची भोजने झाली. थोडी शांतता झाल्यावर नंदयशोदाने अक्रूराला विचारले, “आज वृंदावनात पायधूळ कशी झडली ?”
“कंस महाराजांचा निरोप घेऊन आलोय.”
कंसाचे नाव निघताच नंदाच्या कपाळाला आठी पडली. यशोदा तर संतापलीच. रागानेच तिने विचारले,”तो दुष्‍ट आता आणखी काय म्हणतोय ?”
“तसं काही विशेष नाही, त्याने मोठा यज्ञ करायचे ठरविले आहे. तो यज्ञाचा सोहळा बळराम, कृष्णानी पाहावा अशी त्यांची इच्छा आहे. यज्ञ संपला की मी परत घेऊन येईन त्यांना.”
“कृष्णाला मथुरेला पाठवायचं ?” यशोदा.
“हो—काही दिवस—”
अक्रुराचा निरोप ऐकताच आपल्या हृदयावर कोणीतरी वज्रपहार करतो आहे, असे तिला वाटले. ती अस्वस्थ झाली. ताडकन म्हणाली, “नाही. ते कदापि शक्य नाही. कृष्ण माझा जीव की प्राण आहे. त्याच्याशिवाय मी एक क्षणही जगू शकणार नाही.”
तिचे उत्तर ऐकून अक्रूर आणि नंद क्षणभर गप्प राहिले. नंतर अक्रूराने तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्‍न केला, पण तिची समजूत पटेना. कृष्णाला एक क्षणभरही दृष्‍टीआड करायला ती तयार होईना. कंसाच्या सापळ्यात पाठवायला तिचे मन तयार होईना. अखेर कृष्णानेच आपल्या मायेचा प्रभाव यशोदावर पसरला. त्याला मथुरेला जायलाच हवे होते. त्याशिवाय कंसाचा समाचार घेता येणार नव्हता. मायेच्या प्रभावाने यशोदा संभ्रमात पडली. अजूनही ती अनुमती द्यायला तयार होत नव्हती. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. अखेर नंदाने तिची खूप समजूत घालून तिला शांत केली. कृष्णाला आपल्या कुशीत घेऊन ती त्याला थोपटत होती. रात्रभर रडत होती. डोळ्याला डोळा लागला नव्हता. सकाळ झाली. जाण्याची वेळ झाली. यशोदेचे चित्त मुळीच ठिकाणावर नव्हते. तिला काही सुचत नव्हते. तिचे मन सैरभैर झाले होते. कृष्ण प्रवासाला निघाला होता, त्या वेळी योग्य ते मंगलचिंतनही ती करु शकली नाही. त्याच्याबरोबर प्रवासासाठी शिदोरी देण्याचेही ती विसरुन गेली. श्रीकृष्णाला हृदयाशी घेऊन ती सारखा विलाप करीत होती, अखेर बळंच कृष्णाला तिच्यापासून सोडवून रथावर बसवले. बलरामही आला आणि अक्रूराचा रथ मथुरेच्या मार्गावर दौडू लागला. कृष्णाला घेऊन रथ चालला होता. रथचक्रांच्या खुणा भूमीवर उमटत होत्या, जणू धरारुपी यशोदेचे छेदलेले हृदयच पृथ्वीदेवी व्यक्‍त करीत होती. कितीतरी वेळ ती जाणार्‍या रथाकडे पाहत होती. तिच्या शरीरातले चैतन्य नाहीसे झाले
होते. जणू प्राणपक्षीच उडून गेला होता. गलितमात्र होऊन ती घरात आली होती. खरं म्हणजे गोपींनी तिला आणली होती. तिला कृष्णाशिवाय काही सुचेना. ती वारंवार रस्त्यावर जाऊ लागली. ज्या रस्त्याने कृष्ण गेला, त्या रस्त्याकडे हात करुन दुःखातिरेकाने म्हणू लागली, “अरे, अक्रूर कृष्णाला घेऊन चालला आहे. त्याला थांबवा. त्याच्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. थांबवा त्याला आणि माझ्या कृष्णाला कुणीतरी परत आणा रे !”
तिची ही अवस्था पाहून गोपींना, नंदाला वाईट वाटे. दुःख होई. कृष्णालाही आपल्या मातेच्या दुःखाची कल्पना होती. मथुरेला गेल्यावर दुसर्‍याच दिवशी कृष्णाने उद्धवाला बोलावले आणि त्याला आपल्या मातेचे सांत्वन करायला पाठवले. तो यशोदेकडे आला. त्याने अनेक प्रकारे तिची समजूत घातली. पण उपयोग झाला नाही. यशोदेचे अश्रू तो पुसू शकला नाहि. तोही दुःखी मनाने परत कृष्णाकडे गेला. उद्धव येताच कृष्णाने मातेबद्दल चौकशी केली. त्याने यशोदेच्या दुःखाचे वर्णन करताच कृष्णाचेही डोळे भरुन आले. त्याचाही कंठ दाटून आला. सद्‌गदित स्वरात तो म्हणाला, “उद्धवा ! पाहिलंस यशोदेचं माझ्यावर किती प्रेम आहे ते ! वात्सल्यभावाने माझी भक्‍ती कशी करावी याचा श्रेष्‍ठतम आदर्शच यशोदेने घालून दिला आहे. उद्धवा, अशी माता मिळायला खरंच भाग्य लागतं.”
कृष्णाचा कंठ पुन्हा दाटून आला. डोळे पाझरु लागले. उद्धवाने यशोदेच्या कृष्णावरच्या प्रेमाचा नुकताच अनुभव घेतला होता. आता कृष्णाच्या मातृप्रेमाचा त्याला प्रत्यय येत होता. भक्‍तीच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन त्याला घडत होते. त्याच्याही अंतःकरणातल्या भक्‍तिवीणेच्या तारा छेडल्या जात होत्या. अन् यशोदेच्या त्या वत्सल मूर्तीपुढे त्याचे हात नकळतपणे जोडले जात होते, मस्तक नम्र झाले होते. 

कहाणी गणपतीची


कहाणी गणपतीची

ऐका परमेश्वरा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळें, विनायकाचीं देवळें, रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा ? श्रावण्या चौथीं घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पसापायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबीं भोजन करावं, अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं घ्याईजे; मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी दिव्याच्या अंवसेची

कहाणी दिव्याच्या अंवसेची

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं. पुढं ह्या अंवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे
लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ? मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्षा पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरीं आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी धरित्रीची


कहाणी धरित्रीची

ऐका परमेश्‍वरा धरित्रीमाये, तुझी कहाणी. आटपाट नगर होतं, नगरांत एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी ? धरित्रीमायेचं चिंतन करी. वंदन करी. धरित्रीमाये, तूंच थोर, तूंच समर्थ. काकणलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, नारायणासारखे पांच पुत्र दे, दोघी कन्या दे, कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे. हा वसा कधीं घ्यावा ? आखाड्या दशमीस घ्यावा, कर्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतियेला घ्यावा, माघी तृतियेला संपूर्ण करावा. सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गाईंचीं पावलं काढावीं व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं ? वाढाघरची सून जेवूं सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. ही धरित्रीमायेची साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संप्रूण (संपूर्ण).

कहाणी आदित्यराणूबाईची


कहाणी आदित्यराणूबाईची

ऐका आदित्यराणूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा आणावयास रानांत जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसतां ! तो मला सांगा ! तुला रे वसा कशाला हवा ? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! ब्राह्मण म्हणाला, उतत नाहीं, मातत नाहीं घेतला वसा टाकीत नाहीं. तेव्हां त्या म्हणाल्या श्रावणमास येईल. पहिल्या आदितवारीं मौनानं (मुकाट्यानं) उठावं. सचीळ वस्त्रासहित स्नान करावं. अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या (नागवेलीच्या) पानांवर रक्त चंदनाची आदित्यराणूबाई काढावी, सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तांतु करावा, त्यास सहा गांठी द्याव्या, पानफूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप गूळ -खोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा. सह मास चाळई, सहा मास चाळावी. माधीं रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं ? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर. लोणकढं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी. नसेल तर जोडगळसरू द्यावी, नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करवं. अस वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली, तेव्हां राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावूं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिऊं लागला, कांपूं लागला, तेव्हां राजाचे राणीनं सांगितलं कीं भिऊं नका, कांपूं नका. तुमच्या मुली आमचे येथे द्या ! आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या ? दासी कराल, बटकी कराल ! राणी म्हणाली, दासी करीत नाहीं, बटकी करीत नाही. राजाची राणी करूं, प्रधानाची राणी करूं.
मार्गेश्वराचा महिना आला, ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरीं गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या ! गूळ खात नाही, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे, ती तूं ऐक ! तुझी कहाणी ऐकायला मला कांहीं वेळ नाहीं. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोंच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणूण बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या ! गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक ! तुझी कहाणी नको ऐकूं, तर कोणाची ऐकूं ? घरांत गेली, उतरंडीचीं सहा मोत्येंआणलीं. तीन आपण घेतलीं, तीन बापाच्या हातांत दिलीं. त्यानं मनोभावें कहाणी सांगितली. लेकीणं चित्तभावें ती ऐकली. नंतर जेवूण खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे ? जिनं कहाणी ऐकली नाहीं, ती दारिद्रानं पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे ! इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितलं. मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये ! पहिल्या आदितवारीं पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कआ आला आहे ? काय आला आहे ? फाटकं नेसला आहे. तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे ! परसदारानं घेऊन या ! परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं-माखूं घातला, पीतांबर नेसायला दिला, जेवूं-खाऊं घाअलं, कोहोळा पोखरला, होनमोहोरा भाल्या. बाबा, कोठें ठेवूं नको, विसरूं नको, घरीं जतन करून जा ! वाटेनं आपला जाऊं लागला, तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरीं गेला. विचारलं, काय रे बाबा मावशीनं काय दिलं ? दैवें दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, तें पण सर्व गेलं ! पुढं दुसर्‍या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहीला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन माझा निरोप सांगा. त्यांनीं सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं-माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला, जेवूं-खाऊं घातला, काठी पोखरून होनमोहोरांनी भरून दिली. बाबा, कोठें ठेवूं नको, विसरूं नको, घरीं जतन करून घेऊन जा ! म्हणून सांगितलं. वाटेंत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवें दिलें, तें सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाहि पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातला. नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. कोठें ठेवूं नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरीं जातांना विहिरीच्या कांठीं नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरींत उतरला, तों नारळ गडगडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं, ‘काय रे बाबा, मावशीनं काय दिलं ?’ आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाहि प्रधानाचे राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला जेवूं-खाऊं घातलं. त्याला दह्याची शिधोरी दिली होनमोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातची शिधोरी घेऊन गेला. घरीं गेला, आईनें विचारलं, काय रे बाब, मावशीनं काय दिलं ? आई गं, मावशीनं दिलं पण दैवानं तें सर्व नेलं ! पांचवे आदितवारी आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली, न्हाऊं घातली, माखूं घातली. पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करूं लागली. काय वसा करतेस तो मला सांग ! बहीण म्हणाली, अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करूं ? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणमास आला. सांगिप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले. मला रे पापिणीला छत्रं कोठली ? चामरं कोठली ? पाईक कोठले ? बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली आहे. एकमेकींना बहिणी-बहिणींनी आहेर केले. वाटेनें जाऊं लागली, तों पहिल्या मजलेस सैंपाक केला, राजाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं, वाटेनं एक मोळीविक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये ! तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ ? माझं पोट भरलं पाहिजे ! असं म्हणून तो राणीकडे आला. तशीं सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं व तीन आपल्या हातांत ठेविलीं. मनोभावें कहाणी सांगितली. चित्तभावें त्यानं ऐकली. त्याची लांकडांची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, बाई ! कहाणी ऐकल्याचं काय फळ ? काय वसा आहे तो मला सांगा ! तुला रे वसा कशाला हवा ? उतशी, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! उतत नाहीं, मातत नाहीं. घेतला वसा टाकीत नाहीं ! तेव्हा राणीनं वसा सांगितला.
पुढं दुसर्‍या मजलेस गेली. सैंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. माळ्याचा मळा पिकत नाहीं. विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हांक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक ! तो आला. राणीनें सहा मोत्यें घेऊन तीन आपण घेतलीं. तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावें सांगितली, चित्तभावें माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, बाई ! कहाणी ऐकल्याचं एवढं फळ. मग वसा घेतल्याचं काय फळं ? कसा वसा असेल तो मला सांगा ! मग राणीनं त्याला वसा सांगितला.
पुढं तिसर्‍या मजलेस गेली. सैंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. एक म्हातारी आहे. तिचा एक मुलगा वनांत गेला होता. एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणले, आमच्या बाईची कहाणी ऐक ! ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करूं ? मी मुलांसाठीं रडतें आहे, बरं येतें. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्या प्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावें ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला, डोहांत बुडाला होता तो आला, सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ ? काय वसा असेल तो मला सांग ! मग राणीनं तिलाहि वसा सांगितला.
पुढं चौथे मजलेस गेली. सैंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. काणा डोळा मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं, पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्यें आपण घेतलीं. राणीनें मनोभावें कथा सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ ? काय वसा तो मला सांगा ! मग राणीनं त्याला वसा सांगितला.
पाचव्या मुक्कामास घरीं आले. सैंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले, साती दरवाजे उघडले. लोहघंगाळ पाणी तापविलं, षड्‌रस पक्वान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घांसास केंस लागला. ते म्हणाले, अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे ? राजाच्या राणीला बारा वर्षे दरिद्र आलं होतं, तिनें आदितवारी वळचणीखालीं बसून केंस विंचरले होते. काळं चवाळं, डोईचा केंस, वळचणीची काडी डाव्यां खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे ! राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊं नये.
ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणा डोळा, मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो !’ ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी मंगळागौरीची



कहाणी मंगळागौरीची

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लक म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आण. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाहीं, म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस, निळीं वस्त्रं परिधान कर, रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बोवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत, आंत देवीची मूर्त आहे. मनोभावं पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घर-दारं आहेत, गुरं-ढोरं आहेत, धन-द्रव्य आहे, पोटी पुत्र नाहीं म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झालें आहे तर तें तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलिस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे ! त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपति आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरीं जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.
देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खालीं उतरून पाहूं लागला तों आपला मोटेंत आंबा एकच आहे. असं चारपांच वेळा झालें. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणें नाहीं असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. कांही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जातां जातां काय झालं ? वाटेत एक नगर लागलं. तिथं कांहीं मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीच भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी म्हणू लागली – काय रांड द्वाड आहे, काय रांड द्वाड आहे ! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करिते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हें भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं ? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आई-बापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू; म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामा-भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरजं लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजविलं. दोघं झोपी गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे ! तिनें सर्व तयारी केली. दृष्टान्ताप्रमाणे घडून आलं. कांहीं वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली आंगठी दिली. पहांटेस उठून ताट घेऊन बिर्‍हाडीं गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.
दुसरे दिवशी काय झालें ? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली. तों आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली हा माझा नवरा नाहीं, मी याजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सांपडतो ? नंतर त्यांनीं अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावांनीं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक जेवू लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्रान न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा ! ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी पाय धुताना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव‍र्‍यानं आंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे ? त्यानं लाडवांचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा ! सासरमाहेरची, घरची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ! ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.