Tuesday 12 February 2013

रामभक्त हनुमान .......Marathi Katha story

एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती.
हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला,
`सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?'
तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते;
कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.'
हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की,
नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते,
तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया.
मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला.
तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.    

तात्पर्य : मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले ?
मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते.
रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता.
म्हणूनच श्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता.
आपणसुद्धा सेवा करायला पटकन पुढे आलो, तर देवाची लाडकी मुले होऊ.

"रावणाला कोणी मारला ?" Marathi Funny Story Katha Vinod

एक शिक्षण अधिकारी
एकदा एका शाळेत गेला
सहजच एका वर्गात शिरला,
एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला.
बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला.

"रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला
सारा वर्ग शांत शांत जाहला
प्रश्न् पुन्हा एकदा विचारला
"मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला
अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला -
"रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?"
मास्तरांनी खुलासा केला -
आमचा विद्यार्थी साधा भोळा
गांधी अहिंसा ठाऊक त्याला
कशाला कोण मारेल रावणाला ?
अधिकारी आणखी वैतागला,
मुख्याध्यापकांकडे गेला,
झाला प्रकार सांगितला,
"रावणाला कोणी मारला ?
विद्यार्थी सांगत नाहीत" - म्हणाला 

मुख्याध्यापक म्हणाले -
"शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?";
"जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?" :-D :-D :-D 

"विश्वास ठेव" - Very Nice , Must Read - कवीयेत्री - रुची


या  विश्वासाच्या  बळावरच  आज  जागी  आहे  देवा .
                  तुझ्या  या  बोलण्यावरच  आज  केली  आहे  सेवा ..
                  
                                              काय  करू  एक  माणूस  आहे  मि ..
                              तुझ्या  इतका  नाही  कळला  कधी  मला ..
                                                                                   
                                                                                   म्हणून  आले  आज  दारी  तुझ्या  देवा ..
                                                                                             भरून  दें  झोळी  आज  पसरवली  तुझ्या  पाया !

साभार  कवीयेत्री - रुची

शिष्याची परीक्षा - गुरु पोर्णिमा विशेष

रामानुजाचार्य शठकोपस्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोपस्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ''माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?''
   रामानुज नम्रपणे म्हणाले, ''गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.'' शठकोपस्वामींनी विचारले, ''हे तुला ठाऊक असतांनासुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?''
   यावर रामानुज म्हणाले, ''वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.'' 
  ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले.  त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले.
   मुलांनो, रामानुजांनी ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगितली. त्यांच्या तळमळीने स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले. आपणही आपल्याला मिळालेले ज्ञान असेच वाटले पाहिजे. 

गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी ! - गुरु पोर्णिमा विशेष


पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे एक बांध घातला होता. त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी काही शिष्यांना सांगितले, ''पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.''
         अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ  गेले. बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही उपयोग नाही; म्हणून सर्व शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ झोपी गेले. सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही. सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ''गुरुदेव, अरुणी हरवला.'' गुरुदेव म्हणाले, ''आपण शेतात जाऊन बघूया.'' सर्व शिष्य आणि धौम्यऋषी शेतात जातात. पहातात तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले. रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला तेथे झोप लागलेली होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत पाणी आले. 
मुलांनो, अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर गुरूंचे आज्ञापालन करण्याची तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा विचार केला नाही; म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया, 'हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा 'आज्ञापालन' हा गुण निर्माण होऊ दे.'