Wednesday 31 December 2014

कहाणी शनिवारची

आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासूसासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरांत बसून सैंपाक करून ठेवीत असे. सासूसासऱ्यांना वाढीत असे, उरलंसुरलं आपण खात असे. असं होतां होतां श्रावणमास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारीं आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाहीं. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊं घालून जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला.

इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झालीं. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासीबटकींनी घर भरलं ! सासूसासरे देवाहून आलीं, तों घर कांहीं ओळखेना. हा वाडा कोणाचा ? सून दारांत आरती घेऊन पुढं आली. मामंजी, सासूबाई, इकडे या ! अग, तूं कोणाच्या घरांत राहिली आहेस ? तिनं सर्व हकीगत सांगितली. शनिवारीं एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाही. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. जेवूं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊं घालून जेवूं घातलं. उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चवथे शनिवारीं त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. 

इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारांत उभी राहिलें. असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरांत गेलीं. त्याना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी गणपतीची



ऐका परमेश्वरा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळें, विनायकाचीं देवळें, रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा ? श्रावण्या चौथीं घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पसापायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबीं भोजन करावं, अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं घ्याईजे; मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.



कहाणी शिळासप्तमीची


आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्यानं एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना, जळदेवतेची प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या. राजा राजा, सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल. हें राजानं ऐकलं. घरीं आला मनीं विचार केला, फार दुःखी झाला. तुझ्या पुष्कळ लोकांच्या जिवापेक्षां नातवाचा जीव अधिक नाहीं, पण ही गोष्ट घडते कशी ? सून कबूल होईल कशी ? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरीं पाठवावी, मुलगा ठेवून घ्यावा.

सासऱ्यांनी आज्ञा केली, सून माहेरीं गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊं माखूं घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यांत नेऊन ठेविला. जळदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला महापूर पाणी आलं. पुढं राजाची सून माहेराहून येऊं लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनीं बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं.

तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली. वशाची आठवण झाली तो वसा काय ? तळ्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीं पान घ्यावं, दहीभात आणि लोणचं वर घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकुळं तळ्यांत टाकावं आणि देवतांची प्रार्थना करावी, जय देवी ! आई माते ! आमचे वंशी कोणी पाण्यात असतील ते आम्हांस परत मिळावेत ! याप्रमाणें तळ्यांत उभं राहून तिनं त्या दिवशीं केल्यावर, बळी दिलेला मुलगा पाय ओढूं लागला. पाय कोण ओढतं ? म्हणून पाहूं लागली, तोंच तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं कडेवर घेतला. आश्चर्य करू लागली, सासरी येऊं लागली. राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलासह येत आहे. राजास आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले. तिला विचारलं, अगं अगं मुली, तुझा मुलगा आम्हीं बळी दिला, तो परत कसा आला ?

मीं शिळासप्तमीचा वसा केला, तळ्यांत वाण दिलं. जळदेवतांची प्रार्थना केली, मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं. राजाला फार आनंद झाला. तिजवर अधिक ममता करूं लागला. जशा तिला जळदेवता प्रसन्न झाल्या, तशा तुम्हां आम्हां होवोत. ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी दिव्याच्या अवसेची


ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.

पुढं ह्या अवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ?

मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.

घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरीं आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी महालक्ष्मीची

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नांव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नांव चिमादेवराणी होतं. त्या राजाला एक शत्रु होता. त्याचं नांव नंदनबनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणीं बुडे, क्षणी अंतराळीं जाई, क्षणीं पाताळीं जाई, असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळं राजा वाळत चालला. एके दिवशीं राजानं सर्व लोक बोलावले. नंदनबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनीं राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरांत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणूं लागला, आई आई, मला भाकरी दे. मी राजाच्या शत्रूला मारायला जातों. म्हातारी म्हणाली, बाबा, तूं गरिबाचा पोर, चार पावलं पुढं जा. झाडाआड वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हंसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली.म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. 

सगळ्यांच्या पुढं गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. सर्व लोक घरीं आलें. त्यांना नंदनबनेश्वर कांहीं सांपडला नाहीं. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झालीं. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्यरात्री काय झालं ? नागकन्या, देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा सांगूं लागल्या. पोरानं विचारलं, बाई बाई, ह्यानं काय होतं ? त्यांनीं सांगितलं, पडलं झडलं सांपडतं, मनीं चितंलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोहि त्यांच्याबरोबर वसा वसूं लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरी जातीजागती झाली, तसा नागकन्या देवकन्यांनीं आशीर्वाद मागितला, तसा ह्यानंहि मागितला. तसा देवींनी दिला. राजाचा शत्रु मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशीं माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकीं घेऊन उद्यां राजाच्या अंगणांत मरून पडेल ! असं म्हणून देवी अदृश्य जाली.

म्हातारीचा पोर घरीं आला. दुसऱ्या दिवशीं राणी पहाटेस उठलीं. परसांत आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजास जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं ह्याला मारलं असेल, असं लोकांनीं राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावू धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरीं आला. त्यानं राजाला विचारलं, राजा राजा, आळ नाहीं केला, अन्याय नाहीं केला; मला इथं कां बोलावलं ? राजा म्हणाला, भिऊं नको, घाबरू नको. माझा वैरी नंदनबनेश्वर कोणी मारला ? सगळे लोक तुझं नांव सांगतात. याचं काय कारण तें सांग.

राजाला पोर म्हणाला, राजा, मीं मारला नाहीं. पण तो देवीच्या वरानं मेला ! राजा म्हणाला, ती देवी कोणती ? तिला तूं कोठं भेटलास ? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालों, त्यांच्यापुढं थोडा गेलों. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येतां येतां रात्र झाली. झाडाखालीं वस्ती केली. रात्रीं नागकन्या- देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरीं जातीजागती झाली. सर्वांना आशीर्वाद असा मिळालां कीं, शत्रु मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशीं माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तों तुझं बोलावणं आलं. राजानं हकीकत ऐकली आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं. भांडार अर्ध दिलं, माडीशीं माडीं बांधून दिली. नवलवाट नांव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागूं लागला.

ही बातमी राणीला समजली. राणीनं नवलवाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखविला. तिला सांगितलं, आश्विनमास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशीं सोळा सुताचा तातू, तेल हळद लावून करावा. सोळा दूर्वा, सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. सोळा अर्ध्य द्यावींत. मग धूपदीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेण असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणं दर आश्विनमासी करावं. स्वतः तिनं वसा समजावून घेतला. तें व्रत पाळूं लागली.

पुढं एके दिवशीं काय झालं ? राजा राणीच्या महालीं आला. सारीपाट खेळूं लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हें का, म्हणून विचारलं, राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरीं हारे बहू, दोरे बहू, कांकणे बहू, कळावे बहू. व्रताचं सूत तोडून टाक ! मला ह्याची गरज नाहीं ! पुढें रात्र झाली. राजाराणी निजली. सकाळीं दासीबटकी महाल झाडूं लागल्या. केरांत त्यांना तातू सांपडला. दासींनीं तो तातू नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला ? त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! तिनं सांगितलं उतणार नाहीं, मातणार नाहीं, घेतला वसा टाकणार नाहीं. तसा तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला.

पुढं आश्विनमास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला ! देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाट माधवराणीचें महालीं गेली. महालक्ष्मीनं तिला आठवण आहे किंवा नाही हें पाहूं लागली. तों घरांत कोठें काहींच तयारी दिसेना. तेव्हां ती पाटमाधवराणीला म्हणूं लागली, अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे ? राणीन उत्तर दिलं. आज माझ्या घरीं काहीं नाहीं. तेव्हां ती राणीला पुन्हा म्हणाली अगं, अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल ! राणीनं उत्तर दिलं, म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाहीं. तेव्हां म्हातारीनं पुन्हां पाटमाधवराणीला हांक मारली. अगं अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला दहीभाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल ! राणी म्हणाली दहीभाताची शिदोरी दिली तर माझ्या राजाला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला ? सवतीच्या न्हाणीं डाराडुरी करीत असशील, अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील ! इतकं राणीनं ऐकलं, खदखदां हंसली.

पुढं म्हातारी निघून गेली, ती चिमादेवराणीच्या महलीं आली. इकडे तिकडे पाहूं लागली तों तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं चिमादेवराणीला विचारलं, अगं अगं चिमादेवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरीं काय आहे ? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरीं महालक्ष्मी आहे. तेव्हां म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच ! राणी म्हणाली, कशानं ओळखावी ? कशानं जाणावी ! तो ती सकाळीं कुंवारीण झाली, दुपारीं सवाशीण झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. तशा तिन्ही कळा तिनं तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीनं तिला घरांत बोलावलं, न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, चौरंग बसायला दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली.

संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजणं घागरी फुंकू लागलीं, तसा घागरींचा आवाज राजाचे कानीं गेला. धुपाचा वसा महालीं आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हांक मारली, नावडतीच्या घरीं आवाज कशाचा येतो, तो तुम्ही पाहून या ! शिपाई नावडतीच्या घरीं आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महालीं आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला ! शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला, मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळू लागली, खेळतां खेळतां पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती-जागती झाली. तसं राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे ! महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊं ? राजा तुला सकाळीं घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणीं डाराडुरी करील ? अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल ! तशी चिमादेवराणीनं तिची प्रार्थना केली कीं, तिला इतका कडक शाप देऊं नये. तसं देवीनं सांगितलं की, राजा तिला बारा वर्ष वनांत तरी धाडील ! असं म्हणून देवी अदृश्य झाली.

उजाडल्यावर राजानं तिला रथांत घातलं. वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधवराणीला निरोप धाडला कीं, राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तूं सामोरी ये ! तशी ती फाटकतुटकं नेसली, घाणेरडी चोळी अंगांत घातली, केस मोकळे सोडले. कपाळीं मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तों राजानं विचारलं कीं, ओरडत किंचाळत कोण येत आहे ? भूत आहे कीं खेत आहे ? शिपायांनीं सांगितलं भूत नाही, खेत नाहीं. तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानांत नेऊन मारून टाका ! असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महालीं आला. राजाराणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधवराणीला रानांत नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसं शिपायांनीं सांगितलं, बाई बाई, रडूं नको. आम्ही तुझ्या हातचं खाल्लेले-प्यालेले आहों. आमच्याच्यानं कांहीं तुला मारवत नाहीं, म्हणून आम्ही तुला सोडून देतों. पुन्हां तूं या राज्यांत कांही येऊ नको ! असें म्हणाले. राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरांत आले.

नंतर ती तशीच फिरतां फिरतां एका नगरांत गेली. पहिल्यानं कुंभाराचे आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते. परंतु एकंहि कळस उतरेना. त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे ? तो ही सांपडली. त्यांनीं तिला हांकून पिटून लावली. पुढं ती कासाराच्या आळींत गेली. तों तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते; पण एकहि चुडा उतरेना. तेव्हां चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. तेथून निघाली ती सोनाराच्या आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते, तों एकहि दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. तिथून निघाली ती साळ्याच्या आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा साडा विणीत होते; पण एकहि साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. पुढं ती रानात निघून गेली.

जातां जातां ऋषींची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली तों ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषि स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाडसारवण करी, पुजेचं मांडून ठेवी. अशी तिनं बारा वर्षे सेवा केली. ऋषि प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथं झाडसारवण कोण करतं, त्यानं माझ्यासमोर यावं. तशी ती ऋषींच्या पुढं आली. नमस्कार केला. ऋषींनी झाडसारवणाच कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगतें. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली, ऋषींनीं पोथ्यापुस्तकं वंचू पाहिली. तों इच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनीं तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवून घेतली, रात्रीं घागरी फुंकविल्या. पहांटे महालक्ष्मीमाय कोल्हापुरीं जातीजागती झाली, तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती.

ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हां देवीनं उःशाप दिला. ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव, त्याला सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊं लागेल. राजा इथं आज-उद्या येईल. तहानेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही सगळी तयारी पहातील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल !

त्याप्रमाणं दुसऱ्या दिवशीं तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली, स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले, पोटभर फराळ केला, पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला. पुढं राजानं शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्याला सगळ्याला पाट माधवराणीच्या हातचा वास कसा आला ? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतों. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालं. आमच्यानं कांहीं तिला मारवलं नाहीं म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तिचा आसपास शोध करा ! शिपाई निघाले. ऋषींच्या गुंफा पाहिल्या. तिथं ही सापडली. राजाला जाऊन शिपायांनीं सांगितलं. राजा उठला. ऋषींच्या गुंफेत गेला. त्याचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला हवाली केलं. तसा उभयतांनीं ऋषींना नमस्कार केला. त्यांना त्यांनी आशीर्वाद दिला.

पुढं राजानं तिला रथांत घातलं. आपल्या नगरीं घेऊन आला, बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठवला, आज पाटमाधवराणीला घेऊन येत आहे, त्याला तूं सामोरी ये ! तशी राणी न्हाली, माखली, पीतांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले, नगरच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजतगाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, वाजतगाजत कोण येत आहे ? नागकन्या कीं देवकन्या ? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाहीं, देवकन्या नाहीं, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे ! तेव्हां राजा पाटमाधवराणीला म्हणाला, तूं जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते ! राणी उगीच बसली. राजानं चिमादेवीराणीला उचलून रथांत घेतली आणि दोघींसह वाजतगाजत नगरांत आला. सुखानं राज्य करूं लागला. जशी पाटमाधवराणीला महालक्ष्मीमाय कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो ! ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

शंबरासुर वध

शंबरासुर नावाचा एक राक्षसांचा राजा होता. असुरांमध्ये जरी त्याला मान होता तरी तो क्रूरकर्मा होता. श्रीकृष्ण व रुक्मिणीचा पुत्र प्रद्युन्न हा आपला वध करणार आहे, असे त्याला समजले. म्हणून प्रद्युन्नाचा जन्म झाल्यावर सहाव्या दिवशी त्याने त्याला पळवून नेऊन समुद्रात फेकले. तेथे एका मोठ्या माशाने त्याला गिळले. काही दिवसांनी एका मासेमाराने त्या माशाला पकडले. तो नेमका शंबरासुराची स्वयंपाकगृहाची व्यवस्था पाहणार्या मायावती या स्त्रीकडे गेला. ही मायावती पूर्वजन्मी कामदेवाची पत्नी होती. 

कामदेव भस्म झाल्यावर त्याच्या पुनर्जन्माची प्रतीक्षा करताना तिने शंबरासुरास मोहित केले व ती त्याच्या अंतःपुरात राहू लागली. मायावतीने तो मासा चिरताच त्यातून एक सुंदर बालक बाहेर आले. मायावतीस नारदाने सांगितले, हा भगवंतांचा पुत्र असून तू त्याचे पालनपोषण कर. तिने त्याचे संगोपन केले. तो तरुण झाल्यावर मायावतीस त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागले. आपल्या आईचे हे आपल्यावर आसक्त होणे प्रद्युन्नाच्या लक्षात येताच त्याने आश्चर्य प्रकट केले. यावर मायावतीने त्याला खरे काय ते सांगितले. प्रद्युन्न ते ऐकताच शंबरासुरावर चालून गेला. मायावतीने शिकवलेल्या मायावी विद्येने त्याने शंबरासुर व त्याच्या सैन्याला मारून टाकले. मायावतीबरोबर तो विमानाने आपल्या पित्याच्या नगरीत आला. 

रुक्मिणीला त्याला पाहताच वात्सल्यभाव दाटून आला व तिला आपल्या हरण झालेल्या मुलाची आठवण येऊ लागली. तो आपला व श्रीकृष्णाचा पुत्र असावा, असेच तिला वाटू लागले. याच वेळी नारदमुनी श्रीकृष्णासह तेथे आले. त्यांनी रुक्मिणीला हा तिचाच मुलगा असून, शंबरासुराचा वध करून तो आल्याचे सांगितले. तसेच हा प्रत्यक्ष कामदेव अर्थात मदन असून, मायावती म्हणजेच त्याची पूर्वजन्माची प्रिया रती आहे, असेही सांगितले. हे सर्व ऐकून कृष्ण व रुक्मिणीसह सर्व द्वारकानगरी आनंदित झाली.

सांबाची सूर्योपासना

सांब हा कृष्ण व जांबवती यांचा मुलगा होय. तो महाबलवान व दिसायला अतिशय सुंदर होता. स्वभावाने मात्र तो अत्यंत गर्विष्ठ होता. एकदा दुर्वास ऋषी हिंडत हिंडत द्वारकेस आले. त्यांचे शरीर अतिशय कृश व रूपही फारसे चांगले नव्हते. गर्विष्ठ सांबाने त्यांची नक्कल केली. त्यांच्याकडे बघून वेडावून दाखवले. त्यामुळे संतप्त होऊन दुर्वासांनी शाप दिला, की तुला स्वतःच्या रूपाचा गर्व आहे, कुरूप म्हणून तू माझी थट्टा केलीस तर तूही कुरूप, कुष्ठरोगी होशील. 

सांबाला शापाचे गांभीर्य कळले तरी त्याने फारसे मनाला लावून घेतले नाही, की वागणुकीतही काही बदल केला नाही. याच वेळी त्रैलोक्यात सतत संचार करणारे नारदमुनी द्वारकेत आले. नारदमुनी सर्वांना वंदनीय होते; पण सांबाने मात्र आपल्या स्वभावानुसार त्यांचा अपमान केला. या उद्धटाला धडा शिकवून त्याला नम्र बनवायचे, असे नारदांनी ठरवले. ते श्रीकृष्णांना म्हणाले,"सांब हा रूपाने अद्वितीय आहे. तुमच्या सोळा सहस्र नारी त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असतात." एवढे बोलून नारद द्वारकेतून निघून गेले.

कृष्णाचा नारदाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पुन्हा काही दिवसांनी जेव्हा नारद द्वारकेत आले तेव्हा कृष्ण अंतःपुरात होता. नारदांनी सांबाला बळेच सांगितले,"सांबा, तुझे वडील तुला हाक मारीत आहेत." नारदांवर विश्वास ठेवून सांब कृष्णाकडे गेला असता सर्व स्त्रिया सांबाकडे पाहत राहिल्या. हे पाहून श्रीकृष्ण रागावले. त्यांनी सांबाला शाप दिला, की तुझ्या रूपाकडे पाहून या स्त्रिया मोहित झाल्य.त्याला तू जबाबदार आहेस. तेव्हा तू कुरूप, कुष्ठरोगी होशील. वडिलांनी दिलेला शाप ऐकताच सांबाला दुर्वासांनी पूर्वी दिलेल्या शापाची आठवण झाली. शापानुसार सांब विद्रूप दिसू लागला. मग पश्चात्ताप होऊन तो पित्याला म्हणाला,"आपण मजवर प्रसन्न व्हावे, या दोषापासून मी मुक्त होईन असे करावे." 

त्या वेळी कृष्णांनी त्याला सूर्योपासना करण्याचा उपदेश केला, तसेच त्यांनी त्याला नारदांना शरण जाण्यास सांगितले. नारदांनी सांबाला सूर्यमाहात्म्य ऐकवले. मग पित्याची आज्ञा घेऊन सांब चंद्रभागा नदीच्या तीरी गेला व त्याने सूर्याची प्रखर उपासना केली. आपले रूप परत मिळवले. तेथे त्याने सूर्याची प्रतिष्ठापना करून सांबपूर नावाचे नगर वसवले. भजन-कीर्तनाची व्यवस्था करून ते नगर प्रजेला अर्पण केले व आपण द्वारकेस गेला. 

रामभक्त राजा सुरथ

श्रीरामांच्या अश्वमेधाचा घोडा कुंडल नगरीत राजा सुरथाच्या देशात आला. राजा सुरथ व त्याची प्रजा श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त होती. घोडा पकडल्यावर आपल्याला नक्कीच श्रीरामांचे दर्शन होईल या विचाराने सुरथाने अश्वाला पकडून ठेवण्यास सांगितले. एके दिवशी यमराज मुनीचा वेष घेऊन राजाच्या दरबारात आले. सुरथाने त्यांचा सन्मान करून प्रभू रामचंद्रांची कथा ऐकवावी, अशी विनंती केली. 

यावर मुनी मोठ्या हसून म्हणाले,"कोण प्रभू रामचंद्र? त्यांचे ते महत्त्व काय? प्रत्येक माणूस आपल्या कर्मानुसार जगतो." या बोलण्याचा राग येऊन सुरथाने त्यांना निघून जाण्यास सांगितले. मग यमधर्माने आपले खरे स्वरूप दाखवून राजाला वर मागण्यास सांगितले. "रामचंद्रांचे दर्शन होईपर्यंत मला मरण नको,"असा वर सुरथाने मागितला. 

इकडे अश्वाला सुरथाने पकडल्याचे शत्रुघ्नाला समजले. तो रामभक्त असल्याने एकदम युद्ध करण्यापेक्षा त्याच्याशी भेटून निर्णय घ्यावा असे ठरले. त्याप्रमाणे अंगद सुरथाला भेटला व शत्रुघ्नाने अश्वाला सोडायला सांगितले आहे, असा निरोप त्याने दिला. यावर सुरथ राजा म्हणाला,"शत्रुघ्नाला भिऊन अश्वाला सोडणे बरोबर नाही. जर श्रीराम स्वतः इथे आले तर मी त्यांना शरण जाईन. नाही तर मी युद्धाची तयारी करतो." मग राजा सुरथ व शत्रुघ्न यांचे युद्ध झाले. हनुमान व शत्रुघ्न यांना जिंकून सुरथाने राजधानीत नेले. त्याने हनुमानास रामचंद्रांचे स्मरण करण्यास सांगितले. आपले सर्व वीर बंधनात अडकलेले पाहून हनुमानाने रामाची प्रार्थना केली. 

रामचंद्र हे लक्ष्मण व भरतासह पुष्पक विमानात बसून आले. राजा सुरथाने त्यांना प्रणाम केला. हनुमानासारख्या वीराला बंधनात ठेवण्याचा पराक्रम केल्याबद्दल श्रीरामांनी त्याचे कौतुक केले. तो क्षत्रीय धर्मानुसार वागला म्हणून त्याला क्षमा केली. मग ते परत अयोध्येस गेले. राजा सुरथाने यज्ञाचा अश्व परत केला व तोही आपल्या सेनेसह शत्रुघ्नाला सामील झाला.

श्रीवत्सलांच्छनाची कथा

ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जनमेजयाला भागवत पुराणात सांगितली आहे. पूर्वी एकदा सर्व ऋषींमध्ये असा वाद निर्माण झाला, की ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांत सर्वांत सात्त्विक कोण? प्रत्येक जण आपापल्या प्रिय देवतेचे नाव घेऊ लागला. शेवटी याचा निर्णय करण्यासाठी ब्रह्मदेवपुत्र भृगू ऋषी यांनी प्रत्येक देवाकडे जाऊन त्याला लत्ताप्रहार करण्याचे ठरले. प्रथम भृगू ब्रह्मदेवाकडे गेले व लाथ मारणार, तोच ब्रह्मदेवाच्या दूतांनी त्यांना मागे ओढले व घालवून दिले. नंतर भृगू शिवलोकी गेले. आता महादेवाच्या जवळ जाऊन लाथ मारणार इतक्यात शिवगणांनी त्यांना ओढून बाजूला नेले. मग भृगू ऋषी क्षीरसागरी भगवान विष्णूंकडे गेले. 

विष्णू शेषशय्येवर निजले होते. लक्ष्मीने त्यांना बसायला सांगितले; पण तसे न करता ते रागारागाने विष्णूंना जागे कर म्हणू लागले."झोपमोड करणे हे पाप आहे," असे लक्ष्मीने म्हणताच भृगू ऋषी जास्तच रागावले व विष्णूंच्या छातीवरील पीतांबर दूर सारून त्यांच्या हृदयावर त्यांनी जोराने एक लाथ मारली. त्याबरोबर जागे होऊन त्यांनी रागावलेल्या भृगूला पाहिले; पण आपण न रागवता मोठ्या प्रेमाने त्यांना ऋषींना आसनावर बसवले व म्हणाले,"दुष्टांचा संहार करण्याच्या कष्टाने मी शिणलो होतो. तुमच्या लत्ताप्रहाराने मला बरेच वाटले. माझ्या कठीण हृदयावर लाथ मारल्याने तुमचा पाय दुखावला असेल. म्हणून मी तुमचे पाय चेपतो," हे ऐकून, विष्णूची ती शांत वृत्ती पाहून भृगूंना पश्चात्ताप झाला; पण विष्णू म्हणाले,"तुमचे हे पदलांच्छन मी माझ्या हृदयावर अभिमानाने मिरवीन व त्याला मी श्रीवत्सलांच्छन म्हणीन."

शंकराचे वाहन नंदी याचा खूर लागून पडलेल्या व्रणाला वत्सलांच्छन म्हणतात; तसेच श्रीवत्स या श्राद्धदेवाच्या मुलाने लाथ मारली म्हणून श्रीवत्सलांच्छन म्हणतात, अशाही कथा ब्रह्मपुराणात आहेत.

पाच पांडव व द्रौपदी

ब्रह्मदेवांनी जी अठरा महापुराणे निर्माण केली त्यांची नावे अशी - ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्त, नृसिंह, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड व ब्रह्मांड. मार्कंडेय पुराण हे त्यापैकी एक महत्त्वाचे पुराण मानले गेले आहे. व्यासशिष्य जैमिनी यांनी मार्कंडेय यांना महाभारतासंबंधी काही शंका विचारल्या. त्यात, "द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी कशी झाली?' अशी एक शंका होती. याचे उत्तर विंध्य पर्वतावर पक्षियोनीत असलेल्या चार धर्मात्म्यांनी दिले ते असे- 

पूर्वी त्वष्टा प्रजापतीचा मुलगा इंद्राच्या हातून मारला गेला. त्या ब्रह्महत्येने इंद्राचे तेज कमी झाले व ते धर्मराजाच्या शरीरात आले. पुत्राच्या मृत्यूने संतप्त झालेल्या त्वष्ट्याने होमकुंडातून वृत्र नावाचा असुर इंद्राला मारण्यासाठी निर्माण केला. त्याच्या अक्राळविक्राळ स्वरूपास घाबरून तह करण्यासाठी सप्तर्षींना पाठवले. त्यांनी चतुराईने वागून इंद्र व वृत्र यांची मैत्री घडवून आणली. पण पुढे इंद्राने विश्वासघाताने वृत्रासुरास मारले. त्यामुळे पुन्हा त्याचे तेज कमी होऊन ते वायूच्या शरीरात सामावले गेले. नंतर इंद्राने गौतमाचे रूप घेऊन अहिल्येस फसवले. तेव्हा त्याचे रूपसौंदर्य त्याला सोडून अश्विनीकुमारांकडे गेले. 

अशा प्रकारे इंद्र हा धर्म, तेज, बल, लावण्य यांना वंचित झाला. इंद्रास जिंकण्यासाठी महाबली दैत्य निर्माण झाले. त्यांनी पृथ्वीवर बरेच अत्याचार केले. आपल्या शांतीसाठी पृथ्वीने देवांना साकडे घातले. तेव्हा सर्व देव आपापल्या अंशाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले. स्वतः धर्मराज कुंतीच्या पोटी युधिष्ठिर म्हणून जन्माला आले. वायुदेवाने भीमाचा जन्म घेतला. अर्जुन हा इंद्राचाच पुत्र असून तो त्याचा अर्धा अंश घेऊन जन्माला आला. 

अश्विनीकुमार-माद्रीच्या पोटी नकुल व सहदेव जन्मले. अशाप्रकारे इंद्र पाच रूपांत अवतीर्ण झाला. इंद्राची पत्नी शची ही द्रौपदीच्या रूपाने अग्नीतून प्रकट झाली. इंद्राने पाच शरीरे धारण केली असल्याने ती एकटी पाच पांडवांची पत्नी झाली. अशा प्रकारे जैमिनींचे समाधान पक्ष्यांनी केले. त्यांच्या आणखीही काही शंकांची त्यांनी उत्तरे दिली. या पक्ष्यांची नावे पिंगाक्ष, विबोध, सुपुत्र व सुमुख अशी असून, दुर्वासांच्या शापामुळे पक्षीण झालेल्या वपू नावाच्या अप्सरेची ती मुले होती. या चौघांना शमीक नावाच्या ऋषींनी सांभाळले. त्यांच्यावर विद्येचे संस्कार करून त्यांना ज्ञानी केले. 

पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन

चेदिदेशात पौंड्रकवंशात वासुदेव नावाचा एक राजा होऊन गेला. अज्ञानवशात स्वतःच्या क्षमता न जाणून घेताच मी भगवान विष्णूचा अवतार आहे, असे म्हणू लागला. एवढेच नव्हे, तर शंख, चक्र, गदा, पद्म ही भगवंतांची चिन्हेही त्याने धारण केली. मग त्याने श्रीकृष्णाकडे दूताकरवी निरोप पाठविला, की तुम्ही वासुदेव हे नाव, तसेच चक्र इत्यादी चिन्हे सोडावी व मला शरण यावे. श्रीकृष्णाने उलट निरोप पाठविला, की मी सर्व चिन्हे घालून उद्याच तुझ्या नगरीत येईन. तू सावध राहा. 

त्याप्रमाणे श्रीकृष्ण गरुडावर बसून सर्व चिन्हांसह पौंड्रकाच्या राजधानीत पोचले. पौंड्रकाच्या मदतीसाठी काशिनरेश आपल्या महान सेनेसह आला. दोन्ही सेना कृष्णाच्या समोर उभ्या ठाकल्या. स्वतः पौंड्रक वासुदेव सर्व चिन्हे, गरुडध्वज, श्रीवत्सचिन्ह इत्यादींसह समोर आला. भगवानांनी एका क्षणात आपल्या शार्ङ्ग धनुष्यातून बाण सोडून शत्रूला घायाळ केले. गदा, चक्र यांनी सर्व सेनेचा नाश केला. आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी काशिनरेश युद्धास सज्ज झाला. भगवानांनी शार्ङ्ग धनुष्यातून सोडलेल्या बाणांनी त्याचेही शिर कापून टाकले. मग श्रीकृष्ण द्वारकेस परत गेले. ते काशिनरेशाचे मस्तक उडून काशीस येऊन पडले होते. त्याच्या मुलाला कळले, की हे कृष्णाचे काम आहे. 

तेव्हा त्याने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले व वर मागितला, की कृष्णाच्या नाशाची काही योजना आखावी. त्यानुसार श्रीशंकरांनी अग्नीपासून एक अक्राळविक्राळ राक्षसी निर्माण केली. ती रागाने "कृष्ण कृष्ण' म्हणत द्वारकेस पोचली. भगवान श्रीकृष्णांनी तिच्यावर आपले सुदर्शनचक्र सोडले. त्या तेजाने ती राक्षसी जळू लागली व सैरावैरा धावू लागली. तिचा पाठलाग करीत ते चक्रही मागे जाऊ लागले. शेवटी हतबल झालेली ती राक्षसी काशीस येऊन पोचली. काशीतील सर्व सेना शस्त्रास्त्रे घेऊन त्या चक्राचा सामना करू लागली; पण त्या चक्राने सर्व सेनेला तसेच नगरीतील सर्व प्रजा, सेवक, हत्ती, घोडे यांना जाळून मगच ते शांत झाले व परत फिरून श्रीकृष्णांच्या हातात येऊन स्थिरावले.

दशरथ कौसल्या विवाह

लंकेचा राजा रावण याला भेटण्यासाठी एकदा नारद गेले होते. तेव्हा मोठ्या गर्वाने रावणाने आपल्या सामर्थ्याचे वर्णन केले; परंतु नारदांनी त्याला सूर्यवंशातील दशरथ- कौसल्या यांचा पुत्र श्रीरामचंद्र यांच्या हातून तुझा मृत्यू आहे असे सांगून सावध केले. या भविष्याची सत्यता पडताळण्यासाठी रावण ब्रह्मदेवांना भेटला. त्यांनी हे खरे असल्याचे सांगून आजपासून तिसर्या दिवशी दशरथ कौसल्येचा विवाह कोसल देशाच्या राजधानीत होणार असल्याचे सांगितले. हा विवाह होऊच नये म्हणून रावणाने सैन्य पाठवून कौसल्येला पळवून आणले; पण स्त्री हत्येचे पातक नको म्हणून एका पेटीत तिला बंद करून समुद्रात सोडले. त्या पेटीवरून दोन माशांत भांडण सुरू झाले व युद्धात जो जिंकेल तो पेटीचा मालक होईल असे ठरले. त्यांनी ती पेटी एका बेटावर नेऊन ठेवली. 

इकडे अजपुत्र दशरथ कोसल देशाला जाण्यासाठी आप्तेष्ट व सैन्य यांच्यासह जहाजातून समुद्रमार्गे निघाला. रावणाला हे कळताच आकाशातून शस्त्रवृष्टी करून त्याने जहाजे फोडून पाण्यात बुडवली. एका फळीच्या आधारे दशरथ पोहत एका बेटावर पोचला. तेथे त्याने ती पेटी पाहिली. ती उघडताच आत कौसल्या दिसली. दोघांनी एकमेकांना सर्व हकिकत सांगितली. विवाहाच्या ठरलेल्या दिवशीच दोघांची योगायोगाने गाठ पडली. अत्यंत आनंदाने पंचमहाभूतांच्या साक्षीने दोघांनी विवाह केला. दिवसा त्या बेटावर फिरावे व रात्री पेटीत राहावे, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. एके रात्री युद्धात जिंकलेला तो मासा पेटीपाशी आला व त्याने ती पेटी दाढेत धरून लंकेच्या किनार्यावर आणली. 

ब्रह्मदेवाची वाणी असत्य झाली हे त्याला कळवावे म्हणून मोठ्या प्रौढीने तो ब्रह्मदेवाकडे गेला, तर दशरथ कौसल्येचा विवाह झाल्याचे त्याला कळले. तसेच त्यांचा ठावठिकाणाही त्याला कळला. रावणाने परत जाऊन ती पेटी आणवली व त्या दोघांस मारून टाकण्यासाठी तलवार उपसली. दशरथही क्षात्रधर्माला जागून युद्धास तयार झाला; पण रावणाची पत्नी साध्वी मंदोदरी हिने परोपरीने रावणाची समजून घालून अनर्थ टाळला. आपल्या अविचाराने राम आताच अवतार घेईल या भीतीने रावणाने हात आवरला व दशरथ कौसल्या यांना विमानाने अयोध्येस पाठवले. दोघे सुखरूप परत आलेले पाहून सगळ्यांना आनंद झाला.

गाईचा महिमा

भागीरथी नदीच्या तीरी तेजपूर नगरीत पूर्वी ऋतंभर नावाचा राजा होता. संतानप्राप्तीसाठी जाबाली ऋषींनी त्याला गाईची पूजा करण्यास सांगितले. गाईचे तोंड, शेपूट, शिंगे, पाठ या सर्वांत देवाचे अस्तित्व असून जो गाईचे पूजन करतो, त्याचे मनोरथ पूर्ण होतात. या संदर्भात जाबाली मुनींनी राजा जनकाची एक कथा सांगितली. एकदा योगसामर्थ्याने राजा जनकाने आपल्या शरीराचा त्याग केला. दिव्य देह धारण करून तो विमानात बसून निघून गेला. त्याने मागे सोडलेले शरीर त्याचे सेवक घेऊन गेले. राजा जनक यमधर्माच्या संयमनीपुरीच्या जवळून चालले होते. त्या वेळी नरकात पापी जीव यातना भोगीत होते. 

जनकाच्या शरीरास स्पर्शून येणाऱ्या हवेमुळे त्यांना छान वाटले. पण राजा तिथून दूर जाऊ लागला तेव्हा पुन्हा त्यांच्या यातना सुरू होऊन ते ओरडू लागले. जनकाने तेथून जाऊ नये अशी याचना करू लागले. त्या दुःखी जिवाच्या करुण हाकांनी जनकाचे मन हेलावले. आपल्या इथे असण्याने जर एवढे जीव सुखी होत असतील, तर आपण येथेच राहावे. हाच आपला स्वर्ग असे वाटून जनक तेथेच नरकाच्या दाराशी थांबला. धर्मराज यम तेथे आल्यावर जनकाला त्याने पाहिले व म्हणाला, "आपण तर श्रेष्ठ धर्मात्मा! आपण इथे कसे? हे पापी लोकांचे स्थान आहे" यावर जनकांनी दुःखी जिवांची दया आल्यामुळे आपण तेथे थांबल्याचे सांगितले. 

तसेच या सर्वांना नरकातून सोडवत असाल तर मी तेथून जाईन, असेही ते म्हणाले. पण त्यांचा उद्धार करायचा असेल तर जनकाने आपले पुण्य अर्पण करावे, असे यमाने सांगितले. जनकाने तसे करताच सर्व पापी जीव नरकातून मुक्त होऊन परमधामास निघाले. मग जनकाने यमधर्मास विचारसे "धार्मिक मनुष्य येथे येत नाही, मग माझे इथे येणे का झाले?" यावर यमाने सांगितले, "आपण पुण्यात्मा आहात, पण आपल्या हातून एक छोटं पाप घडलं. एकदा एक गाय चरत होती. आपण तिथे जाऊन तिचं चरणं थांबवलंत. पण आता आपले तेही पाप संपले असून दुःखी जिवांना मुक्त केल्याने पुण्यही वाढले आहे." हे ऐकून यमराजास प्रणाम करून राजा जनक परमधामास गेला. ही सर्व कथा सांगून जाबाली ऋतंभर राजाला म्हणाले, "गाय संतुष्ट झाली तर तुला गुणी पुत्र लाभेल."

कृपाची जन्मकथा

गौतम महर्षींना शरद्वान नावाचा एक पुत्र होता. त्याला जन्मतःच धनुर्विद्या अवगत होती. त्याची वेदाध्ययनात बुद्धी फारशी चालत नसे. तपश्चर्येच्या जोरावर जसे वेदांचे ज्ञान आत्मसात केले जाते, तसेच शरद्वानाने तपश्चर्या करून सर्व अस्त्रांची प्राप्ती करून घेतली. या त्याच्या कठोर तपश्चर्येमुळे व धनुर्विद्येतील प्रावीण्यामुळे इंद्राला आपल्या आसनाची काळजी वाटू लागली. त्याच्या तपात अडथळा आणण्यासाठी इंद्राने जानपदी नावाच्या अप्सरेची नेमणूक केली. 

ती जानपदी शरद्वानाच्या आश्रमापाशी जाऊन त्याला वश करून घ्यायचा प्रयत्न करू लागली. आपल्या तपसामर्थ्यामुळे बराच काळ शरद्वानाने आपल्या मनाला आवर घातला; पण कालांतराने तो जानपदीच्या मोहाला बळी पडला. त्या दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. ते जुळे त्यांनी गवताच्या बेटात ठेवले व जानपदी परत इंद्रलोकाला गेली. शरद्वान पुन्हा आपल्या कामाला लागला. 

राजा शंतनू एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्याच्या सैनिकाला गवताच्या बेटामध्ये ते जुळे दिसले. त्या जुळ्याजवळ धनुष्यबाणही होता. ही कोणातरी धनुर्धारी माणसाची मुले असली पाहिजेत, हे ध्यानात घेऊन सैनिकांनी त्यांना राजा शंतनूकडे नेले. ते धनुष्यबाणही त्याला दाखवले. राजाच्या मनात कृपा निर्माण झाली व ते जुळे घेऊन तो राजवाड्यात गेला. त्याने त्यांचा सांभाळ केला. त्याने मुलाचे नाव कृप व मुलीचे नाव कृपी असे ठेवले. 

आपल्या मुलांचा सांभाळ राजा शंतनू करीत आहे हे शरद्वानास अंतर्ज्ञानाने समजले. लगेच तो शंतनूकडे आला आणि त्याने कृपाला आपले गोत्र तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याला धनुर्विद्येची दीक्षा दिली. धनुर्विद्येतील सर्व गूढ गोष्टी त्याला शिकवल्या. कृप थोड्याच काळात धनुर्विद्येत आचार्यपदाला पोचला. कौरव, पांडव, यादव कुळातील अनेक वीरांनी कृपाचार्यांपासून धनुर्विद्येचे शिक्षण घेतले.

तपती आख्यान

सूर्याला तपती नावाची एक कन्या होती. ती दिसायला सुंदर तसेच उग्र तपश्चर्या केल्यामुळे विद्वानही होती. तिच्या सौंदर्याच्या, ज्ञानाच्या बाबतीत तिला शोभेल असा पती मिळवण्याचा विचार सूर्य करीत होता. ऋक्षपुत्र संवरण हा सामर्थ्यशाली राजा असून तो रोज सूर्योपासना करीत असे. असा हा धर्मज्ञ संवरण राजा तपतीला योग्य आहे असे सूर्याला वाटले. 

एकदा राजा संवरण पर्वतावर शिकारीसाठी गेला असता, तहानभुकेने व्याकूळ झालेल्या त्याच्या घोड्याचे प्राण गेले. त्यानंतर पायीच हिंडत असता त्याला तपती दृष्टीस पडली. तिचे सौंदर्य, तेज पाहून तू कोण आहेस, असे त्याने विचारले. पण काहीच न बोलता ती सूर्यलोकात निघून गेली. त्यामुळे संवरण राजा मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला. काही वेळाने शुद्ध आल्यावर डोळे उघडताच पुन्हा त्याला तपती समोर दिसली. आपण येथेच गांधर्व विवाह करू, असे त्याने सुचवल्यावर ती म्हणाली,"तुझे जर माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या वडिलांजवळ मला मागणी घाल." इतके बोलून ती पुन्हा अंतरिक्षात अंतर्धान पावली. 

संवरण राजा पुन्हा जमिनीवर कोसळला. राजाचा शोध घेत त्याचा मंत्री तेथे आला. राजाला त्याने शुद्धीवर आणले. राजाने त्याला व सर्व सैन्याला परत पाठवले व आपण आपले पुरोहित ऋषी वसिष्ठ यांचे स्मरण करून सूर्योपासना सुरू केली. तपाच्या बाराव्या दिवशी तपतीने राजाचे मन हिरावून घेतले आहे असे अंतर्ज्ञानाने जाणून वसिष्ठ तेथे आले. राजाशी बोलून ते स्वतः सूर्याकडे गेले व तपतीस घेऊन आले व दोघांचा विवाह करून दिला. 

राजाने आपण सर्व राज्यकारभार अमात्यांवर सोपवून बारा वर्षे तपतीसह तेथेच पर्वतावर वास्तव्य केले. पण या काळात त्याच्या राज्यात दुष्काळाचे संकट आले, प्रजेची दुर्दशा झाली. ते पाहून वसिष्ठ राजा संवरणाला व तपतीला घेऊन पुन्हा राज्यात आले. मग सर्व सुरळीत होऊन राजा संवरणाने अनेक वर्षे तपतीसह सुखाने राज्य केले. तपती व संवरणाचा मुलगा म्हणजे कुरू. हा कुरुवंश पुढे विस्तार पावला. अर्जुन हा कुरुवंशातील श्रेष्ठ वीर. त्याचा महाभारतात तापत्य (तपतीचा वंशज) असा उल्लेख आहे.

नंदीची कथा

राजा जनमेजयाने वैशंपायन ऋषींना विचारले,"नंदी या साधारण पशूच्या अंगी एवढी विलक्षण शक्ती कोठून आली? तसेच शंकराचे ते वाहन कसे झाले?" यावर वैशंपायन ऋषी म्हणाले,"शिरवी नावाचा एक महान तपस्वी ऋषी होता. तो एके दिवशी इंद्राला भेटायला गेला असता त्याचा अपमान झाला. इंद्राला शासन करेल असा पुत्र आपल्याला लाभावा या हेतूने त्याने घोर तप केले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी तुला इंद्र, विष्णू व महादेव यांच्यापेक्षाही पराक्रमी पुत्र मिळेल असा वर दिला. त्याप्रमाणे शिरवी ऋषींच्या शेंडीतून अत्यंत तेजस्वी असा चतुष्पाद पशू पडला. ब्रह्मदेवांनी त्याचे नाव नंदिकेश्वर ठवले. तो वरुण, अग्नी व वायू यांचे प्रतीक असल्याचे सांगितले. 

भूक लागली म्हणून पित्याच्या सांगण्यावरून नंदी क्षीरसागरातील दूध पिऊ लागला. विष्णूचे दूत तसेच स्वतः विष्णू यांनाही तो आवरेना. साठ दिवस युद्ध झाल्यावरही तो हरेना म्हणून विष्णूच त्याच्यावर प्रसन्न होऊन द्वापरयुगात मी तुझे पालन करीन, असे त्यांनी आश्वासन दिले. पुढे पुन्हा भूक लागल्यावर पित्याच्या सांगण्यावरून नंदी इंद्राच्या नंदनवनातील तृण खाऊ लागला. तेव्हा इंद्राशी त्याचे युद्ध झाले. त्याच्या शेपटीच्या झटक्याने इंद्र कैलासावर शंकरांच्या पुढ्यात पडला. नंदीने इंद्राच्या सिंहासनाचा चक्काचूर केला.

इंद्राच्या विनंतीनुसार शंकराचे सैन्य नंदीवर चालून गेले. पण नंदीपुढे सैन्यच काय; खुद्द शंकरही हताश झाले. त्याची अचाट शक्ती पाहून त्यांनी त्याच्यावर कृपा केली. तेव्हा नंदी शंकरांना म्हणाला,"आज तुझ्यासारखा याचक भेटला याचा मला आनंद होतो. तू माझ्याकडे काहीतरी माग." यावर शंकराने त्याला आपले वाहन हो, असे मागणे मागितले. मोठ्या संतोषाने नंदीने ते मान्य केले. शंकरांनी त्याचा स्वीकार करून त्याला सतत आपल्याजवळ ठेवण्याचे तसेच आपल्या अगोदर तुझे दर्शन घेतले जाईल असे सांगितले."तू आपल्या उदरात क्षीरसागरातील दूध, नंदनवनातील गवत व सर्व शस्त्रे साठवलीस म्हणून तुझ्या शेणाचे भस्म मी सर्वांगाला लावत जाईन," असेही शंकर म्हणाले. याप्रमाणे शंकर व नंदी यांचा सहवास घडून आला. सर्व देवांनी शंकराचे नाव पशुपती असे ठेवले. हे कळल्यावर शिरवी ऋषीलाही आनंद झाला.

कलंकी अवतार

द्वापार युगात भगवंतांनी वसुदेव-देवकीच्या पोटी श्रीकृष्णावतार व नंतर सावित्री आणि वसुतर यांच्या पोटी बौद्धावतार घेतला. हा अवतार गुप्त असून, गयासुर इ. राक्षसांचा गुप्तपणे वध या अवतारात झाला आहे. यापुढे कलियुगात त्रिवेणीसंगमावर भगवान कलंकी अवतार हीन कुळात घेतील, त्याची कथा ही अशी - 

पूर्वी जाबाली नावाचा महान तपस्वी ऋषी होऊन गेला. ब्रह्मदेवांच्या वरामुळे त्याला दोन पुत्र व एक कन्या झाली. एकदा अचानक त्याची तब्येत अत्यवस्थ होऊन आपला मरणकाळ जवळ आला, असे त्याला वाटू लागले. जवळ असलेल्या कन्येस त्याने सांगितले, की माझ्या मृत्यूनंतर लगेच माझ्या हातातील मौल्यवान अंगठी काढून घे व तुझे भाऊ वनातून परत आल्यावर ताबडतोब त्यांना दे. जाबालीच्या कन्येने पित्याच्या मृत्यूनंतर अंगठी काढली, पण भावांना दिली नाही. शोकमग्न अवस्थेत दोघा भावांनी प्रेत स्मशानात नेल्यावर त्यांना पित्याच्या बोटातील अंगठीची आठवण झाली. 

त्यांनी बहिणीला विचारले असता, तिने कानावर हात ठेवले. बहीण खोटे बोलत आहे, हे ओळखून भावांनी तिला तू नीच कुळात जन्म घेशील' असा शाप दिला. तिने पश्चात्ताप पावून उःशाप मागितला असता, तुझे लग्न उच्च कुळातील पुरुषाशी होऊन, कलियुग संपता संपता भगवान तुझ्या पोटी कलंकी अवतार घेतील व तुझा उद्धार होईल, असे सांगितले. याने समाधान न होऊन बहिणीनेही भावांना शाप दिला, की तुम्ही पक्षियोनीत जन्माला याल व त्या वेळी तुम्ही एकमेकांचे वैरी असाल. या शापांप्रमाणे जाबालपुत्र कावळा व पिंगळा या पक्षियोनीत जन्माला आले. त्यांचे प्रेम नाहीसे होऊन हाडवैर निर्माण झाले. 

कावळा झालेला मुलगा पुढे मानव योनीत दैत्यगुरू शुक्राचार्य झाले तर पिंगळा झालेला पुत्र देवगुरू बृहस्पती झाले. बृहस्पतीना त्रिकाल ज्ञान व शुक्राचार्याना संजीवनी विद्या प्राप्त झाली, तरी त्यांचे वैर तसेच राहिले. हा सर्व वृत्तांत जनमेजयाला कथन करून पुढे वैशंपायन ऋषी म्हणाले,"कलियुग हे अत्यंत तापदायक युग असून, माणसे अधर्माने वागतील. पापांचा अतिरेक झाल्यावर भगवंताला कलंकी अवतार घ्यावा लागेल. ते दुष्टांचा संहार करतील, नंतर पुन्हा सत्ययुगाला प्रारंभ होईल व पृथ्वीवर सुखसमृद्धी येईल." 

श्वेतराजाचा उद्धार

त्रेतायुगात एक फार मोठे वन होते. एकदा अगस्ती मुनींनी त्या वनातील आश्रमात एक रात्र वास्तव्य केले. दुसर्या दिवशी सकाळी आश्रमाबाहेर रस्त्यात त्यांना एक प्रेत पडलेले दिसले. ते कुणाचे, असा विचार मुनी करत होते तेव्हाच एका विमानातून एक दिव्य मनुष्य तेथे आला व त्या प्रेताचे मांस खाऊ लागला. 

अगस्तींनी त्याला याचे कारण विचारले असता तो म्हणाला,"पूर्वकालात विदर्भदेशी माझा पिता वसुदेव राजा होता. मी त्यांचा मोठा मुलगा श्वेत व मला सुरथ नावाचा लहान भाऊ होता. पित्याच्या मृत्यूनंतर मी राजा झालो. बरीच वर्षे यशस्वीपणे राज्य केल्यावर मला वानप्रस्थाश्रमात जाऊन तपस्या कराविशी वाटू लागले, म्हणून सुरथाला राज्यावर बसवून मी वनात जाऊन उग्र तप केले. त्याच्या प्रभावाने मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. पण तेथे गेल्यावर मी सतत तहानभुकेने तळमळत असे. याचे कारण विचारल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, "हा लोक भूकतहानविरहित असला तरी पृथ्वीवर काहीतरी दान केल्याखेरीज इथे काहीच खायला मिळत नाही. तू राजा असताना कुणाला भीकही दिली नाहीस, अतिथीला जेवण दिले नाहीस, म्हणून तुला तहानभुकेचे कष्ट पडतात. तुझे शरीर पृथ्वीवर पडलेले आहे, त्याचे मांस खाऊन तृप्त हो. तुझे शरीर अक्षय आहे. शंभर वर्षांनी अगस्तीमुनी तुझे हे संकट दूर करतील." 

राजा श्वेताची ही कथा ऐकून अगस्तींनी आपली ओळख सांगितली. राजा त्यांना शरण आला. मुनींनी त्याची त्या घृणास्पद आहारापासून मुक्तता केली. आपला उद्धार केल्याबद्दल राजाने मुनींना एक दिव्य आभूषण कृतज्ञतापूर्वक भेट दिले. त्यांनी दान म्हणून त्याचा स्वीकार केला. पुढे श्रीराम अयोध्येस राज्य करीत असता एकदा अगस्तींच्या दर्शनासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी ते विश्वकर्म्याने बनवलेले दिव्य आभूषण रामांना अर्पण केले. प्राप्त झालेल्या वस्तूचे पुन्हा दान देण्याने महान फलाची प्राप्ती होते, असे सांगत अगस्तींनी ते घेण्याचा रामाला आग्रह केला. राजा हा इंद्र, वरुण, कुबेर, यम यांचा अंश असून तो प्रजेचा उद्धार करतो. आपलाही उद्धार व्हावा म्हणून हे आभूषण तू घ्यावंस, असे अगस्तींनी श्रीरामांना सांगितल्यावर रामाने त्याचा नम्रतेने स्वीकार केला.

महालक्ष्मी अष्टकं स्तोत्र

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते 


नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥१॥ 


नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि ।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥२॥ 

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरि ।
सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥३॥ 

सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि ।
मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥४॥ 

आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि ।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥५॥ 

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे ।
महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥६॥

पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि ।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥७॥

श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते ।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥८॥

महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥१०॥ 

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् ।
महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥