Wednesday 13 February 2013

मनातला देव ...........लेखिका : राजश्री (पुणे )

आज माझ्या लेकीची वार्षिक परीक्षा सुरु होणार होती. माझ्या सासूबाई तिला सहजच बोलून गेल्या कि, "जायच्या आधी देवाला नमस्कार कर म्हणजे देव तुला चांगली बुद्धी देईल. "

"आजी आज अस काय विशेष आहे कि मला आजच चांगल्या बुद्धीची गरज आहे? ती तर मला नेहमी लागणारच." माझी लेक म्हणाली.
"आग आज तुझी परीक्षा ना म्हणून म्हंटल." इति सासूबाई.
"हे बर आहे तुझ. आज कशाची तरी गरज म्हणून हात जोडायचे आणे मग गरज संपली कि विसरून जायचं. देवाला एक प्रकारे लाच देण मला नाही पटत."

लेकीच्या ह्या उत्तरावर मी मात्र खूप विचार करू लागले. मनुष्य स्वभाव कसा विचित्र आहे. गरज असेल तेंव्हा अगदी मन लावून आळवणी केली जाते आणि एकदा गरज संपली कि त्या देवाची आठवण पण राहत नाही. खरच अस का घडत असेल?
तसं पाहायला गेल तर आपल्या प्रत्येक कृतीचे चांगले वाईट परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतात. देव त्याच्यात काहीच मदत करू शकत नाही. हो फार फार तर हे परिणाम झेलायची ताकत देवू शकतो.
यस मला माझे उत्तर मिळाले होते.

मला शाळेत शिकलेले भूमितीचे एक तत्व आठवले, कोणीही जड वस्तू उचलायची असेल तर ३ खांबांचा आधार लागतो. ह्या तीनही खांबांची उंची आणि आकारमान सारखेच असावे लागते. हे तीनही खांब जमिनीत एका योग्य कोनात आणि योग्य अंतरात रोवायचे असतात. ह्यातला एकही खांब जरी नीट उभा राहिला नाही किंवा वेगळ्या आकारमानाचा असेल तर वस्तू नीट उचलली जाणार नाही. जितकी वस्तू जड तितकी उंची आणि कोन अधिक.
अगदी तसंच कुठलाही निर्णय घेताना ३ खांब मजबूत असावे लागतात. पहिला खांब म्हणजे आपले ज्ञान, दुसरा खांब म्हणजे आपले संस्कार आणि तिसरा खांब म्हणजे शांत मन. हे तीनही खांब जर का मजबूत असतील तर आपल्या कृतीचा काहीही परिणाम होवो आपण तो सहज स्वीकारू शकतो.
माझ्या लेकीचे उदाहरण घेतले तर अस समजेल कि परीक्षेत जर का तिला चांगले मार्क मिळवायचे असतील तर उत्तम ज्ञान आवश्यक आहे. ते ज्ञान नसेल तर ती कदाचित काहीही लिहिणार नाही पण तिच्या वरचे संस्कार तिला कॉपी नक्कीच करू देणार नाहीत. पहिले दोन्ही खांब मजबूत असतील पण शांत मन नसेल तरी सुद्धा परिणाम शून्य. म्हणूनच असे काही करणे गरजेचे राहील कि तिला शांत मनाने परीक्षेला सामोरे जाता येईल.

हे शांत मन कोणाला देवाची आराधना करून मिळते, तर कोणाला एक सुरेल तान घेवून. तर कोणी छानसे चित्रच काढेल तर कोणी अजून काही तरी करेल. माझ्या मते जी कृती करून मनाला शांतता मिळते ती कृती म्हणजेच देवाचे एक रूप असते. म्हणूनच माझी आजी कदाचित म्हणायची कि देव हा सगळी कडे व्यापलेला आहे.

मित्रांनो मी माझ्या लेकीला समजावून सांगितलेला देवाचा अर्थ बरोबर कि चूक तुम्हाला काय वाटत?
साभार - लेखिका : राजश्री (पुणे )

No comments:

Post a Comment